मुंबई- अभिनेता सैफ अली खानला देशाचा चौथा सर्वात श्रेष्ठ नागिरक सन्मान पुरस्कार पद्मश्रीने गौरवण्यात आले होते. परंतु हा पुरस्कार तो परत करणार होता. ही कबुली त्याने अरबाज खान होस्ट करीत असलेल्या 'पिंच' या शोमध्ये बोलताना दिली. यावेळी सोशल मीडियावर सक्रिय नसलेल्या सैफला लोक काय म्हणतात याचे ट्विट अरबाजने वाचून दाखवले.
या शोमध्ये आलेला एक ट्विट होता, "पद्मश्री खरेदी करणारा, आपल्या मुलाचे नाव तैमुर ठेवणारा आणि रेस्टॉरंटमध्ये मारामारी करणाऱ्या या ठगाला सेक्रेड गेम्समध्ये भूमिका कशी मिळाली ? हा तर सुमार अभिनय करतो.''
या ट्विटला उत्तर देताना सैफ म्हणाला, ''मी ठग नाही....पद्मश्री खरेदी करणे शक्य नाही. भारत सरकारला लाच देणे अशक्य आहे. यासाठी तुम्हाला ज्येष्ठ लोकांना विचारावे लागेल. परंतु मला हा पुरस्कार स्वीकारायचा नव्हता."
सैफ म्हणाला की, "फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक ज्येष्ठ कलावंत आहेत जे या पुरस्कारासाठी पात्र आहेत, माझ्या खालोखाल असेही लोक आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळण्याची पात्रता नाही. "
यानंतर आपली अडचण त्याने दिवंगत वडिल मन्सूर अली खान पतौडी यांना सांगितली. याबद्दल सैफ म्हणतो, "याबद्दल मी माझे वडिल मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी मनापासून बोललो. मला वडिल म्हणाले की, मला नाही वाटत की तु सरकारला याबद्दल पटवून देऊ शकतोस. म्हणून मी मान्य केले आणि आनंदाने हा पुरस्कार स्वीकारला."
सैफ पुढे म्हणाला, "मी या गोष्टीला काळावर सोपवतो...कारण मी अजून काम करणे बंद केलेले नाही आणि मला अभिनय करायला आवडतो, मी ठिक ठाक काम करीत आहे. जे होत आहे त्यावर मी खूश आहे. मी जे काम केले त्यामुळे या पुरस्कारासाठी मी योग्य होतो हे लोक म्हणतील."
सैफ अलीला 'नवाब' म्हणून हिनवणाऱ्या एका ट्रोलर्सला सैफने सडेतोड उत्तर दिले, ''मला नवाब बनण्यात काही रस नाही मला कबाब खाण्यात जास्त रस आहे,'' असे सैफ म्हणाला.