मुंबई - सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्या 'ड्राईव' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सुरूवातीला हा चित्रपट २०१८ मध्येच होळीच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, ही तारीख नंतर २८ जून करण्यात आली. आता पुन्हा एकदा ही तारीख बदलण्याची शक्यता आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम अजून बाकी असल्याने प्रदर्शनाची तारीख बदलली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरूण मनसुखानी करत असून करण जोहरची निर्मिती असणार आहे.
दरम्यान सुशांत नुकतंच 'सोनचिडीया' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. अशात आता सुशांतच्या या चित्रपटाला आणि जॅकलीनसोबतच्या त्याच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.