आपल्या देशात कलाकारांचे महत्त्व फार अधिक आहे. भारत-चीन युद्धाच्या दरम्यान अनेक कलाकारांनी आपल्या सैन्याचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केल्याचे आपणास ठाऊक आहे. असे असताना एखाद्या कलावंताने सरकारच्या निती धोरणाविरोधात वक्तव्य केले तर त्याच्या विचारांना विरोध करणे मान्य होऊ शकते, मात्र कलावंताची कलाकृतीच नष्ट केली जाणे हे मात्र पटणारे नाही, असे खासदार अमोल कोल्हे यांनी सध्या दीपिका पदुकोण यांच्या संदर्भात उठलेल्या वादावर मत व्यक्त केले.
छत्रपती संभाजी या महानाट्याच्या निमित्ताने खासदार डॉ. अमोल कोल्हे आज अमरावतीत आले आहेत. यानिमित्ताने त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये उद्भवलेल्या वादासंदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, ''सध्या देशात दुर्दैवाने लांगूलचालन करण्याचा प्रकार वाढला आहे. काल-परवा मुंबईत एका मिरवणुकीदरम्या झळकलेल्या पोस्टरमुळे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथील वादाने नवे राजकीय वळण घेतले आहे. देशातील लोकांनी विशिष्ट विचारसरणीच अंगीकारावी असे बंधन घालणे चुकीचे आहे.
''आपल्या देशात लोकशाही आहे. आपल्या देशाची भावी पिढी ही विचारांनी, आचारांनी सक्षम असायला हवी. विरोध हा वैचारिक पद्धतीने विचारांना विरोध व्हायला हवा. ज्या पद्धतीने झुंडशाहीकडून तोंडावर कपडे झाकून हल्ला होतो हा प्रकार दुर्दैवी आहे. अशा घटनेचे कोणीही समर्थन करणारच नाही.
''दीपिका पदुकोण यांनी या घटनेनेबाबत काही भूमिका घेतली ती व्यक्ती म्हणून घेतली की कलाकार म्हणून घेतली? त्यांनी एखादा सिनेमा व्यक्ती म्हणून केला की कलाकार म्हणून केला ? याबाबतही जर साधी संवेदना आणि प्रगल्भता आपण दाखवायला तयार नसू तर येथून पुढे कोणताही कलाकार बोलायला तयार होणार नाही. प्रत्येकाच्या विचाराचा सन्मान हा झालाच पाहिजे मग तो विचार चुकीचा आहे की बरोबर आहे हा भाग वेगळा. कलाकार असो वा कोणी असो त्याच्या विचाराला विरोध व्हायला हवा मात्र त्याच्या कलाकृतीला विरोध करणे चुकीचेच आहे,'' असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.