मुंबई - वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेत सोनाक्षी सिन्हा सहभागी झाली आहे. रुग्णालयाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांना पीपीई किट्स न मिळणे दुर्दैवी असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे.
''आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. दुसऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालण्यापेक्षा मोठे उदात्त काम असू शकत नाही,'' असे सोनाक्षीने म्हटले आहे.
''दुर्दैवाने रुग्णालयात पीपीई किट्सची कमतरता असून यामुळे मेडिकल स्टाफच्या जीवाचा धोका वाढला आहे. माझ्या चाहत्यांना विनंती करते की पीपीई किट्सची देणगी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. हे किट्स अत्यावश्यक रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात येतील. ही या क्षणाची गरज आहे आणि मला खात्री आहे की, आपण सर्वजण एकत्र येऊन या युध्दात लढूयात.'', असे तिने पुढे म्हटलंय.
पीपीई किट्स देणगी स्वरुपात देण्यासाठी सोनाक्षीने चाहत्यांना आवाहन केले आहे. अशी मदत करणाऱ्या चाहत्यांशी ती थेट संवाद साधणार आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना तिने बनवली आहे. जास्तीत जास्त पीपीई किट्स देणगी स्वरुपात देण्याचे नियोजन ती करीत आहे.
या कामात सोनाक्षीसोबत मनिष मुंद्रा, दृष्यम फिल्म्स, अतुल कसबेकर आणि काही सेलेब्रिटी आहेत.