मुंबई - सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना 3 दिवासात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले व सीबीआय चौकशी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता सुशांतला न्याय मिळेल असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला याप्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन्ही सरकारांना आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही लपून राहणार नाही. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त ठाकरे यांचे सेक्रेटरी म्हणून काम करताना दिसत आहेत. सीबीआयला स्वातंत्र्य मिळालं तर योग्य तपास करतील व सुशांतिसिंह हत्या आणि आर्थिक व्यवहार याची आता सखोल चौकशी होईल. मुंबई पोलीस यांच्यामध्ये क्षमता आहे पण सरकार अडथळा आणत आहे. पण आता सीबीआयच्या मदतीने चांगला तपास होईल, अशी आशा भाजप नेते सोमय्या यांनी बोलून दाखवली.
तसेच सोमय्या पुढे म्हणाले की,सुशांतचा घरच्यांची मागणी होती त्यानुसार आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोर्टाने मान्य केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचं म्हणत, महाराष्ट्र सरकारला सुनावलं. कोण कशी चौकशी करत आहे माहीत नाही, पण महाराष्ट्र सरकारने चौकशीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे मत कोर्टाने मांडले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार जी लपवालपवी करत आहे ते आता उघड होईल असे देखील सोमय्या यांनी म्हटले आहे.