मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराणा 'अंधाधून' आणि 'बधाई हो'ला मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच आणखी एका चित्रपटात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. बाला असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. आता आयुष्मानने या चित्रपटाच्या कानपूरमधील चित्रिकरणाला नुकतीच सुरूवात केली आहे.
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत आयुष्मानने याबद्दलची माहिती दिली आहे. आयुष्मानने आपला एक पाठमोरा फोटो शेअर करत आता कानपूरमध्ये असे कॅप्शन दिलं आहे. तर दुसऱ्या फोटोत तो खिडकीतून बाहेर पाहात असून मी कानपूरला जाणार असं कॅप्शन दिलं आहे. तिसऱया फोटोत तो समोर पाहात आहे, या फोटोच्या कॅप्शनमध्ये मी फ्रंट प्रोफाईलमध्येही कानपूरला जाणार, असे म्हटले आहे.

या चित्रपटात आयुष्मानसोबत यामी गौतम आणि भूमी पेडणेकरदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यामीने याआधी 'विकी डोनर' तर भूमीने 'दम लगा के हैशा' चित्रपटात आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'बाला' चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहे, तर दिनेश विजन यांची निर्मिती असणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय आयुष्मान आर्टिकल १५ आणि ड्रीम गर्ल चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

