मुंबई - बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे चाहते जलसा बंगल्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जमले होते. त्यातील अनेकांनी हातामध्ये बच्चन यांचे फोटो आणि बॅनर धरले होते. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी ते आतुर झाले होते. मात्र बच्चन यांचे दर्शन न घडल्याने ते नाराज होऊन परतले होते. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची हात जोडून माफी मागितली आहे.
अमिताभ यांनी सोमवारी ट्विट करुन सर्व चाहत्यांची माफी मागणारी पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलंय, ''जे लोक काल जलसा बंगल्याच्या बाहेर आले होते आणि रस्त्यावर बॅनर धरुन उभे राहिले होते, त्यांची मी माफी मागतो. त्या सर्वांच्या कष्टाबद्दल माझे आभार. मला अजूनही बाहेर पडायची परवानगी नाही. ...आणि देखभाल अनिवार्य आहे. म्हणून क्षमा करा.''
त्यांनी पुढे लिहिलंय, ''काल मी अगोदरच काम सुरू केले होते आणि परतत असताना लोकांनी दिलेल्या शुभेच्छा आणि भेटींचे उत्तरे दिली. हे माझ्यासाठी चांगले होते.''
ब्लॉग पोस्टबरोबरच अमिताभ यांनी 'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवरील एक फोटो शेअर केला.