मुंबई - परवाच आलिया भटने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचे, एटरनल सनशाईन प्रॉडक्शन्सचे, थाटामाटात उदघाटन केले. या संस्थेचे पहिले पुष्प असेल ‘डार्लिंग्ज’ आणि आलिया भट याची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट्सच्या साथीने करणार आहे. गौरी खान आणि आलिया भट निर्मात्यांच्या भूमिकेत दिसतील. ‘डार्लिंग्ज’ चे दिग्दर्शन जसमीत के रीन करीत असून यात आलीय भट, शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गंमतीत म्हणायचं झालं तर, आलीय भट ‘लाल मिरची’ खात ‘डार्लिंग्ज’ची निर्मिती करतेय.
‘डार्लिंग्ज’ सिनेमाचा टिझर या चित्रपटातून जसमीत के रीन चे दिग्दर्शनात आणि आलिया भटचे निर्मितीत पदार्पण होत आहे. ‘डार्लिंग्ज, चे कथानक अनोख्या आई-मुलीच्या नात्याचे असून त्यांच्या कठीण आणि जटिल परिस्थितीशी झगडण्याविषयीची असून त्या कशाप्रकारे आपले अस्तित्व टिकवून ठेवतात याबद्दलचे आहे. रूढीवादी निम्न मध्यमवर्गीय वस्तीतील एका कुटुंबाची कष्टप्रद परिस्थितीबरोबरच्या लढ्याची ही कहाणी असून ती ‘ब्लॅक कॉमेडी’ ढंगाने प्रस्तुत करण्यात येणार आहे. स्त्रीला सन्माननीय पद्धतीने वागविले नाही तर ती कुठले रूप घेऊ शकते हे यातून अधोरेखित करण्यात येणार आहे. जसमीत के रीन, जिने अनेक चित्रपटांसाठी लेखन केलंय, आपल्या दिग्दर्शनीय पदार्पणाविषयी बोलली, ‘मी स्वतःला लकी समजते कारण पहिल्याच चित्रपटात मला आलिया भट, शेफाली शाह सारख्या अत्यंत गुणी आणि टॅलेंटेड स्त्री कलाकार मिळाल्या आहेत. त्यातच रोशन मॅथ्यू आणि विजय वर्मा सारखे दमदार कलाकार आहेत ज्यांच्याशी माझे आधीपासूनच सुंदर ट्युनिंग आहे. आता मला प्रतीक्षा आहे सेटवर जाऊन शूट सुरु करण्याची.’ ‘डार्लिंग्ज’ विषयी बोलताना आलिया भट म्हणाली, ‘या चित्रपटात भूमिका करण्यासाठी नक्की केल्यावर आणि ‘डार्लिंग्ज’ चा महत्वाचा भाग होण्यासाठी मी खरोखर उत्साही आहे. हा खूपच विनोदी आणि डार्क कॉमेडीच्या डोससह एक शक्तिशाली कथानक असलेला चित्रपट आहे. निर्माती म्हणून माझा पहिला चित्रपट म्हणून डार्लिंग्ज च्या निर्मितीत उतरताना मला खूप आनंद झाला आहे, तेही माझ्या आवडत्या शाहरुख खान आणि रेड चिलीज यांच्या सहकार्याने.’रेड चिलीज एन्टरटेन्मेंटचा सीईओ गौरव वर्मा म्हणाला, ‘आमचा प्रयत्न नेहमीच नवीन प्रतिभेसह सहयोग करणे आणि त्यांच्या दृष्टीकोनाचे पालनपोषण करण्याचा आहे आणि डार्लिंग्ज त्या दिशेने एक पाऊल पुढे जाणे आहे. जसमीत एक प्रतिभावान लेखिका आहे आणि ‘डार्लिंग्ज’ मधून सामान्य व्यक्तींच्या जीवनावरील कथानक मनोरंजक पद्धतीने मांडणार आहे. आमच्याकडे शेफाली, विजय आणि रोशनमध्ये एक उत्तम कलाकार आहे आणि अभिनेत्री आणि निर्माती आलिया भट मधून आम्हाला एक अद्भुत जोडीदार लाभला आहे. ही एक उत्तम कथा आहे आणि ती प्रेक्षकांसमोर आणण्यास आम्ही उत्सुक आहोत.’रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि एटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स च्या बॅनरखाली बनणाऱ्या ‘डार्लिंग्ज’चे लेखन परवीज शेख आणि जसमीत रीन यांनी केले आहे. गौरी खान, गौरव वर्मा आणि आलिया भट्ट निर्मित ‘डार्लिंग्ज’ चे चित्रीकरण याच महिन्यात सुरु होणार आहे. आलिया भट सध्या ‘गंगुबाई काठियावाडी’ च्या चित्रीकरणात व्यस्त असून त्यानंतर लगेचच ‘डार्लिंग्ज’ चे शूट सुरु होणार आहे.
हेही वाचा - नेहमीच मोदी सरकारविरोधात भूमिका घेत आलेत अनुराग आणि तापसी