मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईच्या निधनाची बातमी अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली. अक्षयने आईसाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला असतो.
'ती माझ्यासाठी सर्व काही होती. आज मी मोठ्या दुःखात आहे. माझी आई अरूणा भाटीया यांचं निधन झालं आहे. दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. माझे कुटुंब कठीण काळात असताना तुमच्या प्रार्थनांचा मी आदर करतो' ओम शांती, असं लिहित अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या. अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांनी हॉलिडे, नाम शबनम अशा चित्रपटांची निर्माती म्हणून काम पाहिले आहे.
अरुणा भाटिया यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. अक्षय कुमार आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला होता. अक्षय सिंड्रेला चित्रपटाचं युकेमध्ये शूटिंग करीत होता.
हेही वाचा - आईंची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच लंडनहून तातडीने परतला अक्षय कुमार