मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. राजकारणापलिकडचे मोदी जाणून घेण्यासाठी अक्षयने घेतलेली पंतप्रधानांची मुलाखत चांगलीच गाजली. यामुळे त्याला अनेकांच्या टीकांचा सामनाही करावा लागला. तर मतादानादिवशी अनेक कलाकारांनी कुटुंबीयांसोबत मतदान केंद्रावर येत आपलं मत नोंदवलं. मात्र, यात अक्षय कुठेही दिसला नाही.
या दिवशी अक्षय कुमारने मतदान केले नाही. त्यामुळे, नेहमीच देशहिताच्या गोष्टी करणाऱया अक्षयने मतदानाचा हक्क का बजावला नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हाच प्रश्न एका पत्रकाराने अक्षय कुमारला विचारला असता, अक्षयने दिलेली प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित होती.
अक्षयने त्या पत्रकाराला मागे सरकावत रागात.. चलिए चलिए इतकंच उत्तर दिलं आणि या विषयावर इतर काहीही बोलणं टाळत तो त्या ठिकाणाहून निघून गेला. आता अक्षयने या प्रश्नाचे उत्तर देणं का टाळलं आणि मतदान न करण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्यापही समोर आले नाही.