मुंबई - अक्षय कुमारचा मिशन मंगल चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशात मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांसाठी मिशन मंगल चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन केलं गेलं. या स्क्रीनिंगपूर्वी अक्षयनं स्वतः जाऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि याचवेळी प्रश्न-उत्तरांचं एक सत्रही झालं. ज्यात अक्षयनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
यावेळी अक्षयनं त्यांना सांगितलं, की तुमची स्वप्न पूर्ण करा आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट घ्या. यावेळी एका विद्यार्थिनीनं म्हटलं, विज्ञानामध्ये मला खूप रस आहे. जेव्हा मी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासून हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्साही होते. तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याने म्हटलं, माझा आवडता अभिनेता अक्षय कुमार मिशन मंगल चित्रपटात असल्याने मी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होतो. आज अक्षयची भेट घेण्याची आणि त्याच्यासोबत हात मिळवण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
दरम्यान चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतरही अक्षयनं येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांना हा चित्रपट कसा वाटला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाला सर्वच विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मिशन मंगल सिनेमा भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित असून स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.