कोरोना काळात लागू झालेले आणि पुन्हा पुन्हा लागू होणारे लॉकडाऊन चित्रपटसृष्टीला मारक ठरताहेत. अत्यावश्यक गोष्टींपासून लांब ठेवलेली ही इंडस्ट्री भरपूर नुकसान सोसतेय. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत शूटिंग करायला परवानगी नसल्यामुळे आणि जागोजागी फैलावत असलेली कोरोनाची दुसरी लाट यामुळे अनेक चित्रपटांच्या शुटिंगचे, वितरणाचे आणि प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. महत्वाचं म्हणजे या लॉकडाऊन काळात चित्रपटगृहांना टाळे लागले असून अनेक चित्रपटांची गोची झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी सलमान खान ने त्याचा ‘राधे’ ईद ला चित्रपटगृहांतच प्रदर्शित होईल अशी घोषणा केली होती. परंतु कोरोनाच्या आलेल्या महाभयंकर दुसऱ्या लाटेमुळे तो चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला. सलमान खान आणि ईद या कॉम्बिनेशनमुळे ‘राधे’ ला प्रेक्षकांनी भरभरून पाठिंबा दिला आणि त्यामुळे इतरही अनेक ‘मोठे’ चित्रपट ओटीटी वर रिलीज होणार अश्या वावड्या उठल्या. यात अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटांचीही नाव घेतले जात होते.
परंतु ‘मैदान’चे निर्माते बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणव जॉय सेनगुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे. “आम्ही जाहीर करू इच्छितो की ‘मैदान’ च्या प्रदर्शनासाठी आम्ही कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संपर्कात नाही आहोत. तसेच ‘पे पर व्ह्यू’ प्रकारच्या रिलीज साठीही आम्ही कोणाशीही बोलणी करत नाही आहोत. सध्या आमचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार उर्वरित चित्रपटाचे चित्रण पूर्ण करणे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि काही शंका असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा”, असे निर्मात्यांनी संयुक्त पत्रकात नमूद केले आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतीय फुटबॉल संघाला एका शिखरावर पोहोचवणाऱ्या सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित ‘मैदान’ हा चित्रपट आहे. रहिम हे भारतीय संघाचे फुटबॉल प्रशिक्षक होते. १९५० ते १९६३ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते फुटबॉल प्रशिक्षक आणि भारतीय राष्ट्रीय संघाचे व्यवस्थापक होते. त्यांची भूमिका साकारतोय अजय देवगण. चित्रपटाचे या आधी लखनौ, कोलकाता येथे काही भागाचे शुटिंग पार पडले असून उर्वरित भाग मुंबईत चित्रित होत आहे. ‘मैदान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा असून त्यात अजय देवगण सोबत प्रियमणी, गजराज राव आणि रुद्रनील घोष हेही कलाकार आहेत.
हा चित्रपट पहिल्यांदा २७ नोव्हेंबर २०२० ला प्रदर्शित होणार होता परंतु ती तारीख ११ डिसेंबर २०२० करण्यात आली. कोरोना आणि लॉकडाऊन मुळे शुटिंग्स बंद होती त्यामुळे ‘मैदान चे प्रदर्शन १३ ऑगस्ट २०२१ ला करायचे ठरले होते परंतु आता हा चित्रपट यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अजय देवगणने याआधीच जाहीर केले आहे की त्याचा आगामी चित्रपट 'मैदान' येत्या १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसऱ्याच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
हेही वाचा - अभिनव शुक्लाच्या जवळ जाण्याची भीतीने राखी सावंतची 'खतरों के खिलाडी ११' मधून माघार