मुंबई - दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना आज सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार आहे. दिलीप कुमार यांच्या मॅनेजरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या तब्येतीबाबत एक अपडेट शेअर केले आहे.
..हे आहे ते ट्विट
"दिलीप साहेबांना नॉन-कोविड पी.डी हिंदुजा हॉस्पिटल, खार येथे रुटिन चाचणी व तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे इथे आणले आहे. डॉ. नितीन गोखले यांच्या नेतृत्वात आरोग्य सेवा कर्मचार्यांचे पथक त्यांच्याकडे लक्ष देत आहे. कृपया त्यांची तब्येत लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करा.”
दिलीप कुमार हे सध्या हिंदुजा रुग्णालयात सिनियर डॉक्टर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट (फुफ्फुसांचे स्पेशालिस्ट) डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली आहे. गेल्या महिन्यातही कुमार यांना चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि दोन दिवसांनंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते.
हेही वाचा - मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; या सेवा राहणार रद्द
जेव्हापासून कोरोना-उद्रेक झाला, तेव्हापासून दिलीप कुमार व त्यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू हे संपूर्णतः विलगीकरणात राहत होते. त्यांची वये पाहता आणि दिलीप कुमार यांची प्रकृती लक्षात घेता ते अत्यंत गरजेचे होते. किंबहुना या ९८ वर्षीय सुपरस्टार कलाकाराने सर्वांना घरातच राहण्याची विनंती केली होती, जेणेकरून कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ ला यश मिळू शकेल.
गेल्या वर्षी दिलीपकुमार यांचे भाऊ एहसान खान आणि अस्लम खान, अनुक्रमे ९० आणि ८८ वर्षीय, हे दोघेही कोरोनाने ग्रस्त होते आणि त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे दिलीप कुमार जेव्हा कधी हॉस्पिटलची पायरी चढतात तेव्हा त्यांच्या असंख्य, ज्यात बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकारही आहेत, चाहत्यांना काळजी वाटणे साहजिकच आहे.
हेही वाचा - मुंबई : काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून भाजपा युवा मोर्चाकडूनही आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध