मुंबई - शहरातील धारावी भागात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने यावर आनंद व्यक्त केला आहे. अजयने ट्विट करून म्हटले आहे की, "ख्रिसमस आनंद घेऊन आला आहे. धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे."
शुक्रवारी एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी शून्यावर पोहोचल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. १ एप्रिलला येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत गेले. येथे लोक दाटीवाटीने राहत असून विषाणूचा प्रसार रोखणे फार जिकीरीचे काम होते. मात्र, आरोग्य विभागाच्या अथक आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे मधल्या काळात हळूहळू कोरोना रुग्ण कमी होत गेले आणि शुक्रवारी तर एकाही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला असून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनेही ट्विट करून याविषयी आनंद व्यक्त केला.
दसऱ्याच्या मुहूर्तावर अजयचा चित्रपट
अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर अजयचा चित्रपट मैदान पुढील वर्षी 15 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अजय ‘मेडे’ चित्रपटातही दिसणार आहे. ज्यात अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तेलगू क्राइम कॉमेडी 'ब्रोचेवारेवरूरा' च्या हिंदी रिमेकचे हक्कही अजयने खरेदी केले आहेत.