मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा 22 ऑगस्ट रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयाबाहेर दिसले होते. अनेक मीडिया रिपोर्टनुसार लीलावती रुग्णालयात अभिषेक बच्चनवर हाताच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. अभिषेकच्या भेटीसाठी अमिताभ आणि श्वेता रुग्णालयात आले होते असे मानले जात आहे.
अभिषेकच्या दुखापतीचे वृत्त व्हायरल झाले असले तरी बच्चन परिवार किंवा रुग्णालयाने या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. अमिताभ आणि श्वेताच्या लीलावती भेटीने मात्र या अफवांना चालना मिळाली आहे.
बच्चन कुटुंबीय काळजीत
गेल्या वर्षी कोरोनाच्या विळख्यात बच्चन पिता-पुत्र अडकले होते. प्रथम कोरोनामुळे अमिताभ बच्चन व नंतर अभिषेकही मुंबईतील लीलावती इस्पितळात भरती झाले होते. आता पुन्हा एकदा शुटिंगच्या दरम्यान दुखापत झाल्याने अभिषेक लीलावतीमध्ये दाखल झाला आहे. साहजिकच बच्चन कुटुंबीय काळजीत असून अभिषेकला धीर देण्यासाठी अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. काल रात्री ते अभिषेकला भेटायला गेले होते तसेच आज दुपारीही ते दोघे पुन्हा लिलावतीमध्ये पोहोचले.
अभिषेकच्या उजव्या हाताला जखम
अभिषेक बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि शूटिंगदरम्यान तो जखमी झाला आणि त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा अभिषेक ला भेटण्यासाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले असता ‘पॅपराझी’ ने त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. सूत्रांनुसार, अभिषेकला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्याचा हात प्लास्टरमध्ये असून त्याला ‘स्लिंग’ वापरण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून हाताच्या हालचालींवर मर्यादा ठेवता येतील.
बॉलिवूडमधील प्रत्येक घटना काटेकोरपणे आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या विरल भायानीने अमिताभ आणि श्वेता लिलावतीमध्ये शिरतानाचे क्षण टिपले. अमिताभ यांनी सैल कुर्ता आणि पायजामा घातला होता. त्याचबरोबर त्यांनी मास्क परिधान केला होता व हुडी, हेडस्कार्फ पण घातले होता. श्वेता बच्चनने ‘कॅसुअल्स’ मध्ये होती.
विराल भायानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, "अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आढळून आल्या होत्या. ते इथे नियमित चेकअपसाठी आले आहेत की वॅक्सीनसाठी आले आहेत याबद्दलची खात्री नाही."
अभिषेक दुसऱ्या मुलाचा बाप होणार?
दरम्यान अभिषेक दुसऱ्या मुलाचा बाप होणार असल्याचीही चर्चा अनेक वेबलॉइडवर सुरू आहे. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच विमानतळावर दिसली होती. यावेळी हौशी फोटोग्राफर्सनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती दुसऱ्या मुलासाठी गर्भवती असल्याची चर्चा सुरू झाली. ऐश्वर्या मनीरत्नम यांच्या ‘पोन्नीयन सेल्वान’ या चित्रपटाच्या शुटिंगहून ओरछा, मध्य प्रदेशातून घरी परतली होती. तिच्यासोबत मुलगी अराध्याही होती.
अभिषेककडे भरपूर काम
कोविड निर्बंध शिथिल झाल्यावर अभिषेक बच्चन याने त्याच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. वृत्तानुसार अभिषेकने २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'ओथा सेरुप्पू साइज 7' या तामिळ चित्रपटाचे हक्क संपादित केले असून स्वतःच्याच बॅनरखाली तो याची निर्मितीसुद्धा करतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन पार्थिबन करीत असून अत्यंत कडक कोविड-प्रोटोकॉल सांभाळत याचे शूटिंग सुरु होते. स्टार्ट-टू-फिनिश शेड्यूलमध्ये चित्रपट पूर्ण करण्याची त्यांची योजना होती परंतु अभिषेकला झालेल्या दुखापतीमुळे ते शक्य होईल असे वाटत नाही कारण त्याचा हात कमीतकमी सहा आठवडे प्लास्टरमध्ये ठेवावा लागणार असून त्यानंतर फिजिओथेरपी च्या सत्रांनंतर तो ठीक होण्याची संभावना आहे.
कामाच्या पातळीवर अभिषेक बच्चन 'बॉब बिस्वास'मध्ये दिसणार आहे, यात तो कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत आहे. विद्या बालनी भूमिका असलेला हा चित्रपट सुजॉय घोषच्या थ्रिलर कहानीचा ऑफशूट आहे. अभिषेककडे दसवी हा चित्रपटदेखील आहे. यात तो एका अशिक्षित राजकारण्याची भूमिका करीत आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि निमरत कौर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा - सलमान खान 'टायगर 3' मधील फर्स्ट लूकमध्ये दिसतोय डॅशिंग