सॅनफ्रान्सिस्को – फेसबुक हे 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी विदेशी शक्तींचा हस्तक्षेप थांबवण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे फेसबुकला टीकेचे धनी व्हावे लागते. चालू वर्षात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त फेसबुक आणि गुगलने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
मतदानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी फेसबुक कंपनीने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वोटिंग इन्फॉर्मेशन सेंटर सुरू केले आहे.
फेसबुकच्या उपाध्यक्ष (उत्पादन आणि सामाजिक परिणाम) नाओमी ग्लेट यांनी फेसबुककडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती ब्लॉग पोस्टमधून दिली आहे. त्यांनी म्हटले, की निवडणुकीमधील प्रामाणिकतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांकडून मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. व्होटिंग सेंटरच्या मदतीने लोकांना निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दलची हालचाल माहिती करू घेणे शक्य होणार आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या फेसबुक पोस्टवर लेबलिंग करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना निवडणुकीविषयी अधिकृत माहिती मिळू शकणार आहे. मतदानासाठी नोंदणी आणि मतदान करण्याची माहिती देण्यासाठी गुगलने सर्चमध्ये दोन फीचर उपलब्ध करून दिले आहेत. त्याविषयी गुगलने ट्विट केले आहे.
निवडणुकीच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत असल्याचे गुगलने म्हटले आहे. धोका विश्लेषण गटाकडून (टीएजी) आणि विश्वास आणि सुरक्षिततेच्या टीमकडून गुगल आणि वापरकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी कंपनीने ई-मेल, जी-सूट अशा विवध उत्पादनांसाठी अतिरिक्त सुरक्षा देण्यास सुरुवात केली आहे. गुगलकडून निवडणुकीत राजकीय पक्षांच्या जाहिराती स्वीकारण्यात येतात. त्याबाबत लोकांना पारदर्शकतेने माहिती मिळण्यासाठी गुगलने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.