नवी दिल्ली : पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमती आणि पर्यावरणाचे संकट पाहता कार कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. या क्रमाने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) वित्तपुरवठा करणारे डिजिटल प्लॅटफॉर्म रेव्हफिन सर्व्हिसेसचे पुढील पाच वर्षांत 20 लाख वाहनांना वित्तपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. दरवर्षी तीन ते चार पट वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि संस्थापक समीर अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
ईव्हीसाठी भारत मोठी बाजारपेठ : समीर अग्रवाल पुढे म्हणाले की, भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगात आता जलदगतीने वाढ होणार आहे. कंपनीला आपले लक्ष्य पूर्ण करण्याचा विश्वास आहे. या उद्देशासाठी कर्ज आणि इक्विटीद्वारे निधी उभारणे सुरूच राहणार आहे. अग्रवाल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'दीर्घकालीन दृष्टीकोनातून, आम्ही ईव्हीसाठी खूप मजबूत स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे आम्ही येत्या पाच वर्षांत 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांना वित्तपुरवठा करण्यासाठी वचनबद्ध आहोत'.
मासिक 15 टक्क्यांची वाढ : तुमचे हे लक्ष्य खूप मोठे नाही का, असे विचारले असता ते म्हणाले की, 'मासिक कर्ज वितरण दरमहा सुमारे 15 टक्क्यांनी वाढत आहे. गेल्या वर्षभरात त्यात चौपट वाढ झाली आहे. आपण असेच पुढे जात राहिलो तर आपण हे ध्येय साध्य करू शकू. 2023 - 24 मध्ये 50,000 इलेक्ट्रिक वाहनांसाठी वित्तपुरवठा करण्याचा कंपनीचा मानस आहे. गेल्या 51 महिन्यांत, कंपनीने 17,118 इलेक्ट्रिक वाहनांसाठी वित्तपुरवठा केला आहे'.
जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळले लिथियमचे साठे : जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचे साठे आढळून आल्यानंतर भारतातील ईलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनांवर त्याचे परिणाम होणार आहेत. ईलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही दिसून आले आहे. हे साठे आढळून आल्यामुळे आता देशात लिथियम बॅटरीचे उत्पादन वाढणार असल्याचे तज्ज्ञ म्हणात आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारत सरकार ईव्ही बनवण्यास चालना देत आहे. आता देशात मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्याने ईव्ही बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात भारताची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.