नवी दिल्ली iPhone In India : टाटा समूह आता भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहासोबतच्या विस्ट्रॉन फॅक्ट्रीच्या कराराला नुकतीच मान्यता देण्यात आली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) सोशल मीडियावरून ही माहिती दिली. टाटा समूह आता देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेसाठी भारतात अॅपलच्या आयफोनचं उत्पादन करेल.
'आयफोन १५' ची निर्मिती करेल : तायवानची विस्ट्रॉन फॅक्ट्री कर्नाटकात स्थित असून, मार्च २०२४ पर्यंत येथून सुमारे १.८ अब्ज डॉलर्स किमतीच्या आयफोनची निर्मिती होईल. टाटा या फॅक्ट्रीतून जागतिक बाजारपेठेसाठी 'आयफोन १५' ची निर्मिती करेल. सुमारे वर्षभरापासून या कराराची चर्चा सुरू होती. विस्ट्रॉन फॅक्ट्री आयफोन १४ मॉडेल्सच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. येथे तब्बल १०,००० हून अधिक लोक काम करतात.
भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक : अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेलं व्यापार युद्ध, तसेच वाढत्या चिनी कामगार खर्चामुळे अॅपलला उत्पादनाचा पर्यायी स्त्रोत शोधणं भाग पडलं. भारताची मोठी ग्राहक बाजारपेठ, कुशल कर्मचारी वर्ग आणि अनुकूल सरकारी धोरणांमुळे भारत हा यासाठी एक आकर्षक पर्याय म्हणून उदयास आला. भारत मोबाइल फोनचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे.
भारताच्या निर्यातीचा वाढता आकडा : सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतानं ५.५ अब्ज डॉलर्स (४५,००० कोटींहून अधिक) किमतीचे मोबाइल फोन निर्यात केले. गेल्या वर्षी याच कालावधीतील निर्यात ३ अब्ज डॉलर्स (सुमारे २५,००० कोटी) होती. आता चालू आर्थिक वर्षात भारतात मोबाइल फोनची निर्याती १,२०,००० कोटी रुपयांचा आकडा पार करेल, असा अंदाज आहे.
हेही वाचा :