हैदराबाद - अलीकडे जंगलाजवळील खेडी आणि शहरांमध्ये वन्य प्राणी आढळून येण्याच्या घटना सातत्याने समोर येत असून त्यामुळे गोंधळ उडत आहे. जंगलाभोवती राहणारे शेतकरी आणि ग्रामीण लोकांसाठी ही नवीन समस्या नाही. तेलगू राज्यात वाघ, अस्वल, रानडुक्कर, माकड आणि बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांच्या मनुष्य वस्तीतील वावरामुळे जनावरे आणि मानवाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कॅनडामधील 'सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्च'ने सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, मागील २० वर्षांत देशभरात सर्पदंशातून १२ लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, यातील निम्म्याहून अधिक मृत्यू केवळ आठ राज्यांमधील ग्रामीण भागात झाले आहेत. त्यामध्ये तेलगू राज्यांचा समावेश आहे. जंगलांजवळील गावांमध्ये सर्पदंश होण्याची अधिक शक्यता असते. काही काळापूर्वी, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने मानवी वस्तीत प्रवेश करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या यादीत सापाचा देखील समावेश केला आहे. अलीकडील काळात माहिती प्रसारणाच्या वेगवान प्रणालीमुळे आपल्याला वेळोवेळी वन्यजीवांचे अस्तित्व आणि स्थलांतर याबद्दल माहिती मिळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे जंगलांमध्ये पाणी आणि अन्नाचा अभाव, जंगलतोडीमुळे प्राण्यांच्या अधिवासाचे होणारे नुकसान आणि वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढून नवीन वस्त्या वाढल्यामुळे ही समस्या अधिकच वाढली आहे. याची कारणे जाणून घेण्यासाठी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
अलीकडे खेड्यांमध्ये वाढलेला वाघांचा वावर धोकादायक आहे. तेलंगणा राज्यातील असिफाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. परिणामी तेलंगणामध्ये पहिल्यांदाच मानवांवर होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्यातील पलवंचा येथे तीन महिन्यांच्या मुलावर कोल्ह्याने हल्ला केल्याने त्याला गंभीर जखमी केले. आदिलाबादच्या इंद्रवेल्ली भागामध्ये शेती करत असताना एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. दुसऱ्या घटनेत शेतावर काम करीत असताना एका शेतक्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. करीमनगर, कामरेड्डी व इतर ठिकाणीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. आंध्र प्रदेशातही वनक्षेत्रालगत असलेल्या खेड्यापाड्यात वन्य प्राण्यांच्या आढळून येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वन्य प्राणी मानवांवर किंवा जनावरांवर कोणत्या परिस्थितीत आक्रमण करतात हे शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केल्यास समस्येचे मूळ नक्की शोधता येईल. वन्यजीवांविषयी जागरूकता नसल्यामुळे अनेकदा लोक अनावश्यक भीती बाळगून असतात. उदाहरणार्थ, करीमनगर जिल्ह्यातील रामदगु मंडल गावातील शेतात नुकताच आढळून आलेला बिबट्या आफ्रिका खंडातील असल्याची चर्चा सर्वदूर पसरली. पण शेवटी तो कुत्र्यासारखा दिसणारा एक जंगली प्राणी 'हेना' असल्याचे लक्षात आले. इतकेच नाहीतर शेतात आढळून आलेले जंगली मांजराला पाहून तो वाघ असल्याचा गैरसमज झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यास त्वरित आवश्यक असलेली प्रथोमपचार पद्धती काय असली पाहिजे याची वनविभागाने जनतेला माहिती दिली पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावर चित्रपट, मल्टी मीडियाच्या स्वरूपात ही माहिती प्रसिद्ध केली पाहिजे. वन्यजीवांच्या कोणत्या प्रजाती मानवी अधिवासात सर्वात जास्त आक्रमण करतात आणि त्या समस्येवर मात कशी करावी याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाने एक विशेष प्रणाली तयार केली पाहिजे. जंगलतोड रोखण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करणे वनविभागासाठी फायदेशीर ठरेल. वनसंपदेची लूट करणाऱ्या, जनावरांची शिकार करुन त्यांची कातडी व पंज्यांची विक्री करणार्या तस्कर टोळ्यांना पकडले पाहिजे. वन्यप्राण्यांच्या अधिवासावर होणारे आक्रमण रोखण्याचा हा एक उपाय असेल. वन्य प्राण्यांच्या हालचालींवर पाळत ठेवणे आवश्यक आहे. त्या तपशीलांची नोंद प्रत्येक जिल्ह्यात करावी. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना आणि जनावरांचे होणारे नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरकारने वनविभागाला विशेष निधी राखून ठेवणे आवश्यक आहे. वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई म्हणून १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने केली आहे. याचाच एक भाग म्हणून पीडित कुटूंबास तातडीने पाच लाख रुपये दिले जातील. तर, उर्वरित रक्कम कुटुंबातील सदस्यांच्या नावे निश्चित ठेव म्हणून बँकेत जमा केली जाते. तसेच बँक ठेवीच्या मॅच्युरिटी पूर्वी ही रक्कम काढायची असल्यास वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. जंगलांच्या आसपास राहणाऱ्या कुटुंबांना मदतीची खात्री देण्यासाठी उर्वरित राज्यांनीही देखील समान धोरणांचे अनुसरण केले पाहिजे. वन्यजीवांप्रती प्रेम असणे खूप आवश्यक आहे. ते आपली संपत्ती आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. वन्यजीवांचे संरक्षण करताना त्यांना व नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
- सिरीपुरम श्रीनिवास