मुंबई : महाराष्ट्रात आज अनेक महत्त्वाची शहरे असून या शहराचा विकास करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी अहोरात्र कष्ट उपसले आहेत. या दिग्गज नेत्यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे शहरांना महत्त्व प्राप्त झाले आहेत. त्यातीलच शहराच्या विकासाची जाण असलेले नेते म्हणून जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. प्रत्येक शहराची स्वतःची एक मांडणी असते, याची जाण जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजींना होती. कोणत्याही शहराच्या विकासाचे नियोजन करण्यापूर्वी तेथील हवामान, पाणी आणि संसाधनांचा विचार करणे आवश्यक असते, याबाबत बाबूजींना माहिती होते. त्यांची समज शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर पसरली होती, खरं तर त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता.
बाबुजींनी शहरांचे नशीब बदलणारे निर्णय घेतले : बाबूजी उद्योगमंत्री असताना नागपूरजवळ बुटीबोरी औद्योगिक वसाहत उभारली जाऊ शकते, असे मी अनेकदा म्हणालो. मात्र, त्यांच्या कार्यकाळातच नाशिक आणि संभाजीनगर शहरांचे औद्योगिकीकरण होऊ लागले. बाबूजींनी संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या शेकडो उद्योगांचा पाया घातला, हे आजच्या पिढीला माहिती नसेल, त्यामुळे ही माहिती त्यांना द्यायला हवी. नेतृत्वाने भूतकाळाचा आढावा घेतला पाहिजे, वर्तमानात जगले पाहिजे आणि भविष्याचीही कल्पना केली पाहिजे. बाबूजींमध्ये ही क्षमता होती, त्यामुळेच त्यांनी काही शहरांचे नशीब बदलणारे निर्णय घेतले. खरेच तो काळ खूप वेगळा होता.
काँग्रेस पक्षात बाबुजींचा शब्द कोणी टाळला नाही : राज्याच्या राजकारणात बाबुजींचे नाव मोठ्या अदबीने घेतले जाते. बाबूजी राज्याच्या राजकारणात असताना महाराष्ट्रात काँग्रेसचे असंख्य नेते होते. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बॅरिस्टर ए आर अंतुले, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नावांची यादी करता येईल. मात्र बाबुजींचा या सगळ्यांशी चांगले जमत होते, त्यांच्यात काही मतभेद असल्यास ते सोडवण्यासाठी बाबुजींनी कठोर परिश्रम घेतले आहेत. बाबुजींचा स्वभाव, कार्यशैली आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्यांच्या शब्दांना काँग्रेस पक्षात खूप वजन होते. परिणामी त्यांचा शब्द कोणी टाळला नाही, राजकारणात असे होणे अवघड आहे. विरोधकांशीही संवाद साधण्याची बाबुजींची शैली खूप वेगळी होती. व्यक्तीपेक्षा विचार केंद्रस्थानी असतील तर राजकारणाची रूपरेषा अधिक व्यापक होते. बाबूजींबद्दल बोलताना मला हे प्रकर्षाने जाणवते.
बाबुजी दोन पिढ्यांमधील सेतू : जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ होते, पण त्यांना कधीही गर्व नव्हता. आमच्यातील संबंध खूप जवळचे आणि मैत्रीपूर्ण होते. तरुण पिढीशी त्यांच्याच भाषेत संवाद साधणारे नेते कमी आहेत. बाबूजी आमच्याशी संवाद साधत आणि नव्या पिढीला सामावून घेत. त्यामुळे बाबुजी हे दोन पिढ्यांमधील सेतू असल्याचा भास आम्हाला झाला. दिवंगत यशवंतराव चव्हाण हे माझे राजकीय गुरू असले तरी राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांकडून मला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात बाबुजींचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी मला सतत योग्य मार्ग दाखवला, कधी मार्गदर्शक म्हणून, कधी मित्र म्हणून त्यांनी मार्ग दाखविला. राजकारणात सकारात्मकतेला खूप महत्त्व असते. त्यासाठी माणूस म्हणून उदात्त असायला हवे. बाबूजींचा स्वभाव मनमिळावू होता. भेदांच्या पलीकडे माणूस आहे, यावर त्यांचा विश्वास होता.
बाबुजींनी कधीही श्रेष्ठ असल्याचे भासवले नाही : महाराष्ट्राच्या राजकारणात बाबुजींच्या शब्दाला आदर होता. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे. वयाने, कर्तृत्वाने ते ज्येष्ठ होते, पण तरीही त्यांनी कधीही श्रेष्ठ असल्याचे भासवले नाही. मंत्रिमंडळात काम करताना ते अनेकदा मला आणि इतर सहकार्यांना त्यांच्या मनातील कल्पना मीटिंगमध्ये विचारत असत. विचार अधिक परिपूर्ण स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचावेत, हा त्यामागचा हेतू होता. ते मंत्रिमंडळात मंत्री असताना आमचे घनिष्ट संबंध होते. मात्र पूर्वीचे मुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी यांचे नाव एक समाजसेवक, राजकारणी, वृत्तपत्राचे संस्थापक, दूरदर्शी नेते म्हणून इतिहासात निश्चितच घेतले जाईल.
या लेखाचे लेखक शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार आहेत.