हैदराबाद : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या आणि लोकांच्या मनातली भीती वाढत आहे. पण हेही सत्य आहे की मोठ्या संख्येने लोक कोविडशी लढा देऊन बरेही होत आहेत. यात घरी विलीनीकरण करून राहणारे रुग्णही मोठ्या संख्येने आहेत. तेही योग्य उपचार, औषधे घेऊन कोरोनावर विजय मिळवत आहेत. पण यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना थकवा, अशक्तपणा, झोप न येणे या समस्या जाणवत आहेत. कोरोनामधून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि त्यावरचा उपाय याबद्दल इंदूरचे डॉक्टर संजय के. जैन यांनी ईटीव्ही सुखीभवःच्या टीमशी संवाद साधला.
बरे झालेल्या लोकांमध्ये अशक्तपणा का आहे?
डॉ. संजय जैन स्पष्ट करतात की कोविड १९ संसर्गातून बरे झाल्यानंतर लोकांना अशक्तपणा वाटणे अगदी सर्वसामान्य आहे. ही समस्या बर्याच कारणांमुळे असू शकते. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
व्हायरलमुळे अशक्तपणा
सगळ्याच व्हायरलमुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. एसएआरएस.सीओवी – २ विषाणू हा कोविड १९ च्या संसर्गासाठी जबाबदार असतो. तो अतिशय तीव्र आणि त्वरेने पसरणारा आहे. या विषाणूमुळे रुग्ण बरा झाला तरी बराच काळ अशक्त राहतो.
औषधांचे दुष्परिणाम
कोरोना झालेल्या रुग्णाला दिलेली औषधे स्ट्राँग असतात. अँटीबॉडीज आणि अँटीवायरल औषधे आणि विविध प्रकारचे स्टिरॉइड्स देखील औषध स्वरूपात दिली जातात. विशेषत: ज्यात संसर्गाचे परिणाम अधिक आणि तीव्र असतात, त्यांना हेवी औषधे दिली जातात. याचा परिणाम शरीरावर होतो. बरे झाल्यानंतरही हा परिणाम जाणवतो.
कमी भूक लागणे किंवा कमी अन्न सेवन करणे
संक्रमित व्यक्तीची भूक कमी होते. ती व्यक्ती अन्नाचे सेवनही कमी करते. कोविड १९ संक्रमणाच्या वेळी रुग्णाच्या चव आणि गंधावर परिणाम होतो. त्यामुळेही खाण्याच्या इच्छेवर परिणाम होतो. यामुळे रुग्ण बरा होण्याच्या गतीवरही परिणाम होतो. रुग्ण बरा झाला तरी भूक न लागण्याची समस्या राहतेच. पुरेसे अन्न सेवन न झाल्याने अशक्तपणा जाणवतो. पुन्हा नेहमीप्रमाणे भूक लागायला ४ ते ६ आठवडे जातातच.
संक्रमित व्यक्तीला कोमोरबिलिटी किंवा अन्य आजार असणे
कोरोना रुग्णामध्ये कोमोरबिलिटी किंवा इतर आजारही आढळतात. उदा. हेपेटायसिस तसेच मधुमेह असेल तर रक्तातली साखर अनियंत्रित राहते. अशा वेळी व्यक्तीला इन्शुलिन किंवा इतर औषधांची गरज लागते. यामुळेही शरीरात अशक्तपणा जाणवतो.
शरीरात थकवा
कोविड १९ विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर, आपले शरीर विषाणूविरूद्ध शक्य प्रकारे लढा देते, जेणेकरून आपल्या शरीरावर संसर्गाचा फारसा परिणाम दिसून येत नाही. पण या अवस्थेत आपल्या शरीरावर जास्त परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील कमी होते. यामुळे थकवा जाणवतो. शरीर अशक्त होते.
मानसिक आरोग्य
आपल्या मानसिक आरोग्याचा परिणाम शरीराच्या आरोग्यावर पडतो. कोविड १९ मुळे लोकांच्या मनात भीती, अस्वस्थता, तणाव आहे. मनातल्या नकारात्मकतेमुळे शरीरावरही प्रभाव पडतो. त्यामुळेही मानसिक आणि शारीरिक थकावट जाणवते.
या स्थितीचा सामना कसा करायचा ?
डॉक्टर जैन सांगतात, कोविड १९ मधून बरे होताना १४ दिवस रिकव्हरी काळ मानला जातो. पण शरीरातला अशक्तपणा या दिवसांपेक्षा जास्त काळ राहतो. शारीरिक आणि मानसिक अशक्तपणा दूर करण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा –
- कोविड १९ संक्रमण झाल्यानंतर व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक हवे. डॉक्टर जैन सांगतात, ते जेव्हा रुग्णावर उपचार करतात, तेव्हा त्याला सकारात्मक राहायला सांगतात. यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. रुग्ण वेगाने बरा होतो.
- कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर सकस आहार घेणे आवश्यक आहे. आहारात जास्त प्रोटिन्स हवेत. त्यामुळे फुफ्फुसांमधल्या कमकुवत झालेले टिश्यू ठीक होतात. म्हणून आहारात दूध, पनीर, सुका मेवा जास्त असायला हवा. व्यक्तीची शारीरिक स्थिती पाहून व्हिटॅमिन आणि झिंक सप्लिमेंट आहार म्हणून घ्यावा.
- कोरोनामधून बरे झाल्यानंतर व्यक्तीने नियमित व्यायाम करावा. विशेष करून श्वासाचे व्यायाम करावेत. स्पायरोमीटर डिवाइसमुळे ( व्यायामाचे यंत्र ) फुफ्फुसाचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.
- ज्या माध्यमातून नकारात्मकता निर्माण होते, त्यांना दूरच ठेवा. सोशल मीडिया, वर्तमानपत्र, टीव्हीवरच्या बातम्या इत्यादींपासून काळजी घ्या. सकारात्मकता वाढेल अशी पुस्तके वाचा. मन शांत राहील, सकारात्मक उर्जा वाढेल अशा गोष्टींकडेच लक्ष द्या.