हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा जर एकच हेतू असला, तर तो असा असेल, सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात जी नकारात्मकतेची झालर ओढली गेली आहे ती दूर करणे आणि कोरोना विषाणूमुळे झालेली नुकसान भरुन काढणे. शिवाय मानवी उत्साह पुनरुज्जीवित करुन त्यांच्यात जगण्याची एक नवी उमेद निर्माण करणे.
याविषयी पंतप्रधान मोदींची पंच लाईन अशी होती की, “आपल्याला अडचणीत आणणारी जरी असंख्य कारणं असली, तरी आपल्यात अशी लोकंही आहेत. जी आपल्याला अशा अडचणीतून सहज बाहेर काढू शकतात.”
लाल किल्ल्यावरून भाषण देण्याची नरेंद्र मोदींची ही सातवी वेळ होती. आपल्या सरकारच्या प्रयत्नांवर टीका करण्याच्या मनः स्थितीत असणाऱ्या लोकांकडे मोदींनी यावेळी पूर्णपणे दुर्लक्ष केले. शिवाय सध्याच्या जलद गतीने बदलणाऱ्या परिस्थितीत भारताला विकासाच्या मार्गावर स्थिर करण्यासाठी, जे काही करायला हवे ते करण्याचा ठाम निश्चय यावेळी पंतप्रधानांनी बोलून दाखवला.
ते अशाप्रकारच्या अडचणींचा सामना करण्यासाठी तत्पर आहेत, हे मोदींनी या अगोदरच दाखवून दिले आहे. शिवाय त्यांचा उत्साहही अजून गमावलेला नाही. त्यामुळेच त्यांना २०१४ साली मोठा जनादेश तर मिळाला. तसेच २०१९ मध्येही या महत्त्वाकांक्षी भारतीयांनी त्यांच्या पारड्यात प्रचंड बहुमत टाकले. चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना साथीच्या रोगाने सध्या कहर केला आहे. अगदी तेव्हापासून मोदींचे मुख्य लक्ष हे “आत्मनिर्भर भारत” (स्वावलंबी भारत) योजनेवर राहिले आहे. भाषणातही त्यांनी यावरच अधिक जोर दिला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ८६ मिनिटांच्या भाषणात सामर्थ्यवान आधुनिक भारत स्वावलंबी कसा बनेल ? याची ठोस रुपरेषाही सांगितली.
तसेच यावेळी त्यांनी भारताचे ‘मेक इन इंडिया’ धोरणात भर घालत ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ असे नवीन नामकरण केले. ते पुढे म्हणाले की, प्रत्यक्षात याचा अर्थ असा होतो की, भारताने अधिक स्वावलंबी बनले पाहिजे. त्यासाठी देशात उपलब्ध असलेल्या अफाट नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन घेतले पाहिजे.
जर एखाद्याला वाटत असेल की, या निव्वळ थापा आहेत आणि काहीही काम केलेले नाही. त्यांच्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात फिस्कलमध्ये एकूण गुंतवणूकीच्या १८ टक्के थेट परकीय गुंतवणूक नोंदली गेली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. “गेल्या आर्थिक वर्षात देशात विक्रमी थेट परकीय गुंतवणूक झाली आहेच. शिवाय कोरोना विषाणू साथीच्या काळातही बड्या जागतिक कंपन्या भारताकडे पर्याय म्हणुन पाहत आहेत.”
तसेच पंतप्रधानांनी “आत्मनिर्भर भारत” योजनेंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या टप्प्यांचीही माहिती दिली. ज्यामध्ये कृषी पुनरुज्जीवन आणि कृषी- आधारित उद्योगाच्या वाढीसाठी एक लाख कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश असल्याचे सांगितले. उदारमतवादी आयातीला नकार दर्शवताना मोदी म्हणाले की, देश अजून किती काळ फक्त कच्चा माल निर्यात करणार आणि तयार माल आयात करणार ? यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. भारताकडे अफाट प्रमाणात नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत. आता यामध्ये मूल्यवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
“आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’ सोबत ‘ मेक फॉर द वर्ल्ड’ या नवीन घोषवाक्याने पुढे जावे लागणार आहे.” त्यासाठी त्यांनी मल्टी- मोडल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चरची एक विशाल योजना सांगितली, ज्याने संपूर्ण देशाला जोडले पाहिजे. याबाबत बोलताना त्यांनी वाजपेयींच्या काळात सुरू केलेल्या ५,८४६ किमी लांबीच्या गोल्डन चतुर्भुज महामार्गाचा संदर्भ दिला. आणि संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर अशाचप्रकारे चौपदरी महामार्ग तयार करण्याची योजनाही बोलून दाखवली.
अनलॉकच्या विविध टप्प्यात भारतातील सामान्य स्थिती पून्हा बिघडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा अंत कधी होईल, अशी आशा बाळगणाऱ्या असंख्य भारतीयांच्या चिंतेकडेही मोदींनी लक्ष वेधले. त्यांनी कोरोना लसीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, देशात लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. देशात एक नव्हे तर एकूण तीन लसी क्लिनिकल चाचण्यांच्या विविध टप्प्यातून पुढे जात आहेत. ही लस लोकांना उपलब्ध करुन देताना कोणताही विलंब होणार नाही, याची हमी मोदींनी यावेळी दिली. मोदींनी हेही जाहीर केले की, या लसींना सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाईल. कारण या लसी “सर्व भारतीयांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे.”
त्याचबरोबर जनतेच्या उत्तम आरोग्याचा उपाय म्हणून मोदींनी ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. या अभियानांतर्गत प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे असे एक ‘आरोग्य ओळखपत्र’ असेल. या आयडी आणि आरोग्य प्रोफाइलमध्ये रुग्णाला असलेले आजार, त्यांना मिळालेले उपचार, डॉक्टरांनी घेतलेली भेट, वापरलेली औषधे आदी. सर्व माहिती यावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर चीनसोबतच्या सीमावाद आणि कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या एका वर्षानंतरही मोदींच्या भाषणात जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या परिस्थिती बाबतचा विशेष उल्लेख आढळला. त्यांनी बीजिंगला कठोर शब्दांत चेतावणी देण्याचा प्रयत्नही केला. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये नव्याने विधानसभा निवडणुका घेण्यासाठी लवकरच त्यावर काम केले जाईल, असे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले.
“हे वर्ष जम्मू- काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने एक नवीन पर्व आहे. जम्मू- काश्मीरमध्ये सध्या काही मर्यादीत प्रयोग चालू आहेत, हे काम पूर्ण करण्यासाठी देश वचनबद्ध आहे. जेणेकरुन येथे निवडणुका पार पडतील आणि पून्हा एकदा येथे लोकप्रतिनिधी निवडून येतील, ” असे सुतोवाचही त्यांनी केले. त्याचबरोबर, चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत सरकारच्या संदिग्ध भूमिकेवर सतत टीका करणारे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना अप्रत्यक्षणे इशारा देत, पंतप्रधान मोदींनी चीनच्या विस्तारवादाला आणि पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायां बद्दल दोन्ही देशांना ठणकावले. ते म्हणाले की, ज्या – ज्या वेळी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे, त्या त्या वेळी भारतीय सैनिकांनी योग्य ते प्रत्युत्तर दिले आहे. “एलओसीपासून (लाइन ऑफ कन्ट्रोल) ते एलएसी (लाइन ऑफ ॲक्चुअल कन्ट्रोल) पर्यंत जेव्हा जेव्हा भारताच्या सार्वभौमत्वाला ज्याने कोणी आव्हान दिले गेले, तेव्हा तेव्हा आपल्या सैनिकांनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.”
नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) ची सीमावर्ती भागात ताकद वाढवण्यासाठी एक लाखाहून अधिक सैन्य भरती करण्याची नवीन योजना पंतप्रधानांनी बोलून दाखवली. हे सैनिक नंतर सैन्य दलात आणि निमलष्करी दलात नियुक्त केले जातील, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, मोदींनी त्यांच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वपूर्ण पैलू आत्मसात केले आहेत. ते म्हणाले की, “ एक शेजारील देश म्हणुन ते आपापसात केवळ सीमा वाटून घेतात असे नाही, तर ते आपले हृदयही वाटून घेत असतात. जिथे दोन देश आपापसातील संबंधाचा आदर करतात, ते संबंध अधिक घट्ट होतात. आज, भारताचे बऱ्याच शेजारील देशांशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. सध्या आम्ही एकत्रित काम करत आहोत आणि एकमेकांबद्दल खूप परस्पर आदरही आहे.” जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर दक्षिण- पूर्व आशियाई देशांशी असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या संबंधाच्या तुलनेत भारताचे संबंध अधिक चांगले आणि वाढत चालले आहेत.
मोदींनी राममंदिर उभारण्याचा मुद्दाही वगळला नाही, ज्याचे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत भूमिपूजन सोहळाही पार पडले आहे. “शतकानुशतके चालत आलेला रामजन्मभूमीचा वाद आता शांततेच्या मार्गाने सुटला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील लोकांचे वागणे अभूतपूर्व राहिले आहे आणि भविष्यासाठी हे प्रेरणा देणारे आहे,” असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
- शेखर अय्यर