हैदराबाद - मिलेनियम महामारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोविड १९ ने जगातील सर्वच राष्ट्रांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कोविडमुळे बर्याच देशांमधील आरोग्य आणि विकासात्मक उद्दिष्टांची उलथापालथ झाली आहे. अल्पावधीतच संपूर्ण जगाला वेढा घातलेल्या कोविड महामारीने आतापर्यंत तब्बल १८ लाख लोकांचा बाली घेतला आहे. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या बर्याच देशांमध्ये नागरिकांच्या मृत्यूने हाहाकार माजवला आहे. व्यापक प्रमाणात झालेल्या विध्वंसानंतर लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन केले गेले. त्यानंतर काही देशांनी दोन -तीन कंपन्यांच्या लसीला ग्रीन सिग्नल दिला आहे. भारत बायोटेक (कोव्हॅक्सीन) आणि सीरम इन्स्टिट्यूटने (कोव्हीशील्ड) देखील त्यांनी विकसित केलेल्या लसींना त्वरित परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला. या घडामोडीनंतर, केंद्र सरकारने सार्वत्रिक कोविड -१९ लसीकरणाच्या आगाऊ तयारीचा भाग म्हणून 'ड्राय रन' आयोजित केला.
देशभर राबविण्यात येणारे लसीकरण हे अक्षरशः एक महायज्ञ असणार आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे २९ हजार शीतगृहांमधील (कोल्ड स्टोरेज सेंटर्स) तब्बल ८६ हजार कोल्ड स्टोरेज मशीनमध्ये ही लस ठेवली जाईल. लस आवश्यक असलेल्या ठिकाणी योग्य त्या वेळेत ती पोचेल याची खात्री करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. सर्वांच्या समन्वयानेच ही मोहीम पार पाडली जाईल. यासाठी प्रत्येकांशी समन्वय साधत लसीसाठी लाभार्थ्यांची पाळी कधी येईल व कोठे लस दिली जाईल याची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. लसीनंतर लाभार्थ्याला जाणवणाऱ्या प्रतिकूल प्रतिक्रियांची (रिअक्शन) नोंद घेणे आणि त्यानुसार उपचार करणे तणावपूर्ण क्षणांनी भरलेले असेल. या सर्व बाबींचा विचार करता, केंद्राने २३ मंत्रालयांच्या समन्वयाने लसीकरणाची पार्श्वभूमी तयार करणे हे अभूतपूर्व असे ऑपरेशन आहे.
सामूहिक लसीकरण मोहीम राबवण्याचा भारताला अनेक दशकांचा अनुभव आहे. व्यापक लसीकरणाच्या क्षेत्रात मोठा अनुभव असूनही, कोविड -१९ लसीकरण राबविणे हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे.
प्राधान्यकृत लसीकरणासाठी सरकारने २ कोटी फ्रंटलाइन कोरोना योध्यांची निवड केली आहे. एका अंदाजानुसार देशात साधारणतः ५० किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील २८ कोटी लोकांना दीर्घकालीन आजाराने ग्रासलेले आहे. प्रस्तावित लसींना मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची लवकरच सुरु करण्यात येईल या अनुषंगाने देशातील ६८१ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यासाठी ५० हजार जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सार्वत्रिक लसीकरण राबविण्यासाठी देशात ८२ लाख केंद्रांची उपलब्धता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून केवळ पीएचसी किंवा अधिक चांगल्या सुविधा असलेली केंद्रे कोविड लसीकरणासाठी निवडली गेली आहेत. सामान्य काळात, लास विकसित करून त्याची सुरक्षितता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो मात्र बायोटेक कंपन्यांनी वेगाने संशोधन आणि कार्यवाही करत वेगाने लास विकसित केली आहे.
चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो लोकांवर या लसींची चाचणी घेण्यात आली आहे. असे असले तरी कोट्यवधी लोकांना लस दिली जाते तेव्हा काही लोकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. मात्र केवळ लसीमुळेच ही रिअक्शन असेल असे नाही, असे अमेरिकन एजन्सी एफडीएने म्हटले आहे. ज्यांना प्रतिकूल रिअक्शन जाणवेल त्यांना उच्च दर्जाची वैद्यकीय मदत त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावी. संवेदनशील व्यक्तीचे दीर्घकालीन निरीक्षण करून लसीमध्ये आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत.
दुसऱ्यांदा लसीचा डोस देताना खऱ्या अर्थाने वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्राची कसोटी लागणार आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणेला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्णपणे तयार असले पाहिजे. दृढ संकल्पानेच या महामारीचा सामना केला जाऊ शकतो.