जालना- चमन परिसरात असलेल्या महिला व बाल रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला लुटणाऱ्या तीन आरोपींना जालना पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडील माल जप्त केला आहे.
तालुक्यातील चितळी पुतळी येथील श्रीकांत भगवानराव महाकाळे हे त्यांची लहान बहीण रेखा विजय हरबक हिच्या बाळंतपणासाठी रुग्णालयात आले होते. यावेळी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात लोकांनी महाकाळे यांना मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोख रक्कम पळवून नेली होती.
याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या वर्णनावरून आरोपीच्या डोक्यावर केस नव्हते. यावरून पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. लक्ष्मीनारायणपूर भागात राहणाऱ्या रवी वसंतराव जाधव (वय23) ,रोहित संतोष आम्लेकर (वय 21) आणि अन्य एकाने हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे.
या तपास प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, यांच्यासह मनोज हिवाळे, गणेश जाधव, प्रकाश पठाडे, अशोक खरात, वसंत रत्नपारखे यांनी सहकार्य केले.