नागपूर - कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या आर्थिक अडचणींमध्ये आधीच वाढ झालेली असताना सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. नागपुरात अशाच एका प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचे बँक खाते साफ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल ही चक्रावून गेले आहे.
शहरातील वर्मा लेआऊट मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाची सायबर गुन्हेगारांनी तब्बल तब्बल साडे-सात लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्या कुटुंबातील तरूण मुलाला फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाचा नावाने सायबर गुन्हेगारांनी फोन केले. कर्जावर घेतलेल्या तुझ्या लॅपटॉपचा हफ्ता शिल्लक आहे, तो तातडीने भर नाही तर भरमसाठ व्याज आकारले जाईल, असे सांगून भीती निर्माण केली. संबंधित तरुण घाबरला, त्याने त्याच्या सेवानिवृत्त वडिलांच्या डेबिट कार्डचे डिटेल्स त्या भामट्याला दिले. एवढेच नाही सायबर गुन्हेगारांनी भीती दाखवताच वडिलांच्या बँक खात्याशी जोडलेला त्यांचा कस्टमर इन्फर्मेशन नंबर (cif) सुद्धा सायबर गुन्हेगारांना दिला. दुर्दैवाने या कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक खाते आपापसात जोडलेले होते. सायबर गुन्हेगारांनी वडिलांच्या बँक खात्यातून 5 लाख, तर आईच्या बँक खात्यातून 2 लाख तसेच पीडित तरूण आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यातून आणखी 50 हजार असे साडेसात लाख रुपये काही मिनिटातच लंपास केले.
पीडित कुटुंबाने नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली असून त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ज्या पद्धतीने एका खात्यातील महत्वाची माहिती घेऊन सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचे बँक खाते साफ केले आहे. ही या पद्धतीची पहिलीच घटना असल्याने पोलीस ही चक्रावून गेले आहे. आतापर्यंतच्या तपासात सायबर गुन्हेगार बिहार मधून बोलत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस गुन्हेगारांच्या मागावर आहेत.