हिंगोली - जिल्ह्यातील वारंगा फाटा परिसरात २०१८ मध्ये भरदिवसा २ घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना घडली होती. या घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी एका चोरट्यास जेरबंद केले आहे. फिरोज खा साहेब खा (३१ पुसद, जि. यवतमाळ) असे त्या सराईत चोरट्याचे नाव आहे.
घरफोडी प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर बाळापूर पोलिसांनी चोरट्याचा कसून शोध सुरू केला. त्यावेळी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीची कसून चोकशी केली असता, त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले. चौकशीनंतर आरोपीला आखाडा बाळापूर पोलसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीकडून घरफोडीच्या घटनेतील संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल व नगदी पैसे असा एकूण ३ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर चौकशीमध्ये आरोपीने आणखी काही ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. यामध्ये २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.