लातूर - शहरातील अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेल्या मुलानेच डॉक्टरावर चाकूहल्ला केला आहे. यामध्ये डॉ. दिनेश वर्मा हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उदगीर शहरातील 60 वर्षीय महिलेला धाप लागत असल्याच्या कारणाने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, परस्थिती खालावत असल्याने उदगीर येथील डॉक्टरांनी महिलेला लातूरच्या अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर केले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही डॉक्टर काही सांगत नव्हते. शिवाय कोणतेही उपचार न केल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या मोठ्या मुलाने डॉक्टरवर चाकू हल्ला केला. यामध्ये डॉक्टर जखमी झाले आहेत. हल्लेखर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी डॉक्टरावर उपचार सुरू आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेवरही अंत्यविधीची प्रक्रिया सुरू झाली आहे.