शिर्डी - श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय चालवला जात होता. याबाबतची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी या लॉजवर छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी हा व्यवसाय चालवणाऱ्या एजंटच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर काही जबरदस्तीने देहविक्री करणाऱ्या महिलांना सोडून देण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम ३ हजार रुपये आणि ३७ हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जबरदस्तीने वेश्या व्यवसाय -
श्रीरामपूर शहरात लॉजवर वेश्या व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने शहरातील शिवाजी चौकाजवळच असलेल्या पंचशील लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवून दिला. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी वेश्या व्यवासाय सुरू असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा मारला असता, त्याठिकाणी गणेश विश्वनाथ खैरनार (रा. चितळी, ता. राहाता) हा त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पैशाची देवाण-घेवाण करून महिलांना अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गणेश विश्वनाथ खैरनार याचेविरुध्द भादंवि कलम 370 सह स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची या घटनास्थळावरून सुटका करण्यात आली.