पुणे - अल्पवयीन मुलीला गच्चीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. वडगाव शेरी येथे 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान पीडित मुलीच्या आजीने मुलाच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी मुलीलाच नाव ठेवून मारहाण केली. पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिल्यानंतर आरोपी मुलाला आणि त्याच्या आईला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी महिलेची नात दिसत नसल्याने फिर्यादी यांनी शोधाशोध सुरू केली. शोधत शोधत ते घराच्या गच्चीवर गेले असता तेथे त्यांची नात आरोपी मुलासोबत दिसली. गादीवर झोपलेल्या अवस्थेत आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता, असे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. दरम्यान फिर्यादी यांनी पीडित मुलीला घेऊन जात मुलाच्या कुटुंबियांना झाल्या प्रकारची माहिती दिली. यानंतरही मुलाच्या आईने पीडित मुलीला नाव ठेवत तिला हाताने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बनसवडे करीत आहेत.