लातूर : किनगाव शहरालगत असलेल्या वंजारवाडी पाटीलगतच्या गोडावूनमध्ये गुटख्याची साठवणूक करण्यात आली होती. याची माहिती मिळताच किनगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून ३० लाख ५० हजाराचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी किनगाव पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. मात्र, आजही छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जाते. शहरातील काही पान टपऱ्यांवर सर्रासपणे गुटखा विकला जातो. मात्र, प्रशासनाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात विक्रीसाठी सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे.
३० मोठी पांढरी पोती गोवा गुटख्याने भरलेली
या छाप्यात गोवा गुटख्यांनी भरलेली ३० मोठी पांढरी पोती आढळून आली. ज्याची किंमत जवळपास ३१ लाख ५० हजार रुपये आहे. या प्रकरणी किनगाव पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक खुब्बा चव्हाण करत आहेत.