नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यात अनेक महत्वाचे करार केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याचे चांगले फलित मिळाल्याचे दिसून येत आहे. भारत अमेरिका संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये अमेरिका वारी केली होती. त्यांच्या या अमेरिका दौऱ्याचे चांगले फलित मिळाले असून अमेरिकेच्या दुतावासाने तस्करी झालेल्या भारताच्या 105 पुरातन वस्तू भारताच्या दुतावासाकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी अमेरिकेच्या तस्करी विरोधी पथकाचे आणि मॅनहाटनचे जिल्हा वकील अल्विन ब्रॅग यांचे आभार व्यक्त केले.
समृद्ध भारताचा जीवंत वारसा : अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी भारताच्या पुरातन वस्तू अमेरिकन दुतावासाने परत केल्यामुळे अमेरिकन सरकारसह दुतावासाचे आभार व्यक्त केले. भारतातील नागरिकांसाठी या केवळ कलाकृती नसून त्यांच्या जिवंत वारशाचा आणि संस्कृतीचा हा भाग असल्याचे तरनजीत सिंग संधू यांनी स्पष्ट केले. पुरातन वास्तू लवकरच भारतात आणल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या समारंभाला मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालय आणि होमलँड सिक्युरिटी तपास पथकातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत भेट दिल्यानंतर भारत आणि अमेरिकेत सांस्कृतिक संपत्ती करारावर काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सांस्कृतिक कलाकृतींची अवैध तस्करी रोखण्यात मदत होणार आहे.
भारतातील 105 पुरातन वस्तू आहेत अमुल्य : अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सहकार्याला यामुळे आणखी महत्त्व मिळणार आहे. 105 कलाकृती भारतातील उत्पत्तीच्या दृष्टीने विस्तृत भौगोलिक प्रसाराचे प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी 47 कलाकृती पूर्व भारतातील, 27 दक्षिण भारतातील, 22 मध्य भारतातील, 6 उत्तर भारतातील आणि 3 पश्चिम भारतातील असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
भारतीय संस्कृतीचा वारसा परत आणण्यासाठी ठोस प्रयत्न : अमेरिकेने परत केलेल्या भारतीय प्राचीन वस्तू या इसवी सन दुसरे ते तिसऱ्या शतकातील आहेत. यातील काही वस्तू या इसवी सन 18 वे ते 19 व्या शतकातील कलाकृती टेराकोटा, दगड, धातू आणि लाकडापासून बनवलेल्या आहेत. सुमारे 50 कलाकृती धार्मिक थीमवर बनवलेल्या आहेत. यात हिंदू, जैन आणि मुस्लीम धर्माशीही काही वस्तू संबंधित आहेत. तर उर्वरित सांस्कृतिक वारसा असलेल्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. भारत सरकार परदेशातून चोरलेल्या भारतीय पुरातन वस्तू, समृद्ध भारतीय वारसा आणि संस्कृतीची जीवंत प्रतीके परत आणण्यासाठी ठोस प्रयत्न करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेने एकूण 278 पुरातन वस्तू केला सुपूर्द : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अमेरिकेने भारताला सांस्कृतिक सहकार्य केले आहे. प्राचीन वस्तू परत आणण्यासाठी अमेरिकन सरकारकडून भारताला खूप पाठिंबा मिळाला आहे. 2016 मध्ये प्रथमच अमेरिकेकडून 16 पुरातन वस्तू परत करण्यात आल्या. यानंतर 2021 मध्ये 157 प्राचीन वस्तू परत करण्यात आल्या. या वस्तूंसह अमेरिकेने 2016 पासून एकूण 278 सांस्कृतिक कलाकृती भारताला सुपूर्द केल्या आहेत.
सांस्कृतिक करार आमच्या नवीन मैत्रीचा कायमचा भाग असेल - इरिक गार्सिटी : भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रिचे संबंध कायम करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतातील पुरातन वस्तू परत करुन दोन्ही देशातील सांस्कृतिक कराराला मुर्त रुप देण्यात येत असल्याची माहिती अमेरिकेचे राजदूत इरिक गार्सिटी यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यात याबाबतच्या वाटाघाटी आम्ही पूर्ण करणार आहोत. भारतीय प्राचीन वारशांच्या कलाकृती परत करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी अमेरिकन सरकार काम करत असल्याचेही इरिक गार्सिटी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.