वॉशिंग्टन : अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या चिनी बलूनमुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतो आहे. गुरुवारी अमेरिकेच्या मोंटानात एक संशयास्पद चिनी बलून दिसला होता. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे. अँटनी ब्लिंकन काल आणि परवा असे दोन दिवस चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. या भेटीत अँटोनी ब्लिंकन हे चीनच्या अधिकाऱ्यांशी रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा करणार होते.
लॅटीन अमेरिकेतही दिसला बलून : पेंटागॉनने शुक्रवारी संध्याकाळी सांगितले की, आणखी एक चिनी गुप्तहेर बलून लॅटिन अमेरिकेवर उडताना दिसला आहे. या दुसऱ्या बलूनबद्दल अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही. प्रेस सेक्रेटरी ब्रिगेडियर जनरल पॅट्रिक रायडर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही लॅटिन अमेरिकेत बलून दिसल्याच्या बातमीचा शोध घेत आहोत. आमचे आकलन असे आहे की हा आणखी एक पाळत ठेवणारा चिनी बलून आहे. मात्र हा बलून लॅटिन अमेरिकेत कुठे दिसला हे अजून स्पष्ट झाले नाही. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सध्या तो बलून अमेरिकेच्या दिशेने येत नाही आहे.
बलून कॅनडामार्गे मोंटानात पोहोचला : पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर म्हणाले की, हा संशयित चिनी बलून काही दिवस अमेरिकेच्या वर राहण्याची अपेक्षा आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना रायडर म्हणाले की, मी सांगितल्याप्रमाणे आम्ही बलूनवर देखरेख ठेवू. पेंटागॉनने सांगितले की, हा बलून काही दिवसांपूर्वी चीनमधून अलास्काजवळील अलेउटियन बेटांवर आला होता. येथून तो उत्तर-पश्चिम कॅनडामार्गे मोंटानात पोहोचला. हा बलून दीर्घकाळ देशात राहू शकतो. बलून सध्या अमेरिकेच्या मध्यवर्ती भागात असून तो पूर्वेकडे सरकत आहे. बलूनचा जमिनीवर असलेल्या लोकांना लष्करी किंवा भौतिक धोका नाही. आम्ही त्यावर निरीक्षण ठेवून आहे. आमच्याकडे हा एकमेव पर्याय आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन : पेंटागॉनच्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, हा बलून एक चिनी नागरी एअरशिप होता जो त्याच्या नियोजित मार्गापासून भटकला होता. हे एयरशीप मुख्यतः हवामानविषयक संशोधनासाठी वापरले जाते. आम्ही या एअरशिपने अमेरिकेच्या हवाई हद्दीत अनपेक्षितरित्या प्रवेश केल्याबद्दल खेद व्यक्त करतो. कोणत्याही सार्वभौम देशाच्या भूभागाचे किंवा हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
हेही वाचा : Chinese Spy Balloon : आता लॅटिन अमेरिकेत दिसला दुसरा चिनी बलून, पेंटागॉनने केली पुष्टी