न्यूयॉर्क US President Race : अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. एका नवीन सर्वेक्षणानुसार, जर २०२४ ची निवडणूक आता झाली, तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे रिपब्लिकन पक्षाच्या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली आणि रॉन डीसॅंटिस यांच्याकडून पराभूत होतील. तसेच ते माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा फार कमी फरकानं पुढे असतील.
हेली यांना सप्टेंबरपासून सर्वात मोठा फायदा : फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणानुसार, बायडननं ट्रम्प यांच्यावर (४९ टक्के ते ४८ टक्के) एका गुणाची आघाडी घेतली आहे. तर हेलीपेक्षा ते चार गुणांनी (४९ टक्के ते ४५ टक्के) आणि डीसॅंटिस पेक्षा दोन गुणांनी मागे आहेत. ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात दिसून आलं की, दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांना सप्टेंबरपासून सर्वात मोठा फायदा झालाय. १० टक्के समर्थनासह त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. यासह हेली यांनी डेमोक्रॅटीक पक्षात सर्वाधिक (९ टक्के) पाठिंबा मिळवलाय. तर ट्रम्प यांना ५ टक्के डेमोक्रॅट्सचे समर्थन मिळालंय.
हेली बायडन यांना पराभूत करू शकतात : २०२४ च्या अध्यक्षीय शर्यतीतून बाहेर पडलेले माजी काँग्रेस सदस्य विल हर्ड यांनी सांगितलं की, 'हेली यांच्याकडे सध्या मुमेंटम आहे. त्यांना अनुभव आहे आणि त्या एकमेव व्यक्ती आहेत ज्या सतत जो बायडन यांना पराभूत करत आहेत. गेल्या महिन्यात सीएनएन पोलनं सांगितलं होतं की, हेली या रिपब्लिकन पक्षाच्या एकमेव उमेदवार आहेत ज्या २०२४ च्या निवडणुकीत बायडन यांना पराभूत करू शकतात. हेली यांनी जवळपास प्रत्येक सर्वेक्षणात बायडनवर आघाडी मिळवली आहे.
रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांची आघाडी कायम : फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात असंही समोर आलं की, अनेक कायदेशीर आव्हानांना तोंड देऊनही माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपली आघाडी कायम ठेवली आहे. ७७ वर्षीय ट्रम्प यांना रिपब्लिकन मतदारांमध्ये ५९ टक्के समर्थन मिळालंय. मार्चपासून त्यांना ५० टक्क्यांहून अधिक समर्थन मिळतंय. सप्टेंबरमध्ये ते विक्रमी ६० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.
हेही वाचा :
- Maldives Elections : मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू बनू शकतात नवे राष्ट्रपती, भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल?
- US President Race : भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींची लोकप्रियता वाढली, ट्रम्प यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले
- US President Race : अमेरिकेत भारतीयांचा दबदबा, अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा तिसरा उमेदवार उतरला