वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीला आता रंजक वळण प्राप्त झालंय. भारतीय-अमेरिकन उमेदवार विवेक रामास्वामी रिपब्लिकन पक्षात आघाडीवर असलेल्या उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांच्या पुढे फक्त माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत.
रामास्वामी रिपब्लिकन पक्षात दुसऱ्या स्थानी : एका नव्या सर्वेक्षणानुसार, विवेक रामास्वामी रिपब्लिकन पक्षात सध्या दुसऱ्या स्थानी आहेत. ते फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांच्या बरोबरीत आहेत. इमर्सन कॉलेजच्या सर्वेक्षणात दिसून आले की, डीसँटीस आणि रामास्वामी प्रत्येकी 10 टक्क्यांनी बरोबरीत आहेत. केवळ माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पुढे आहेत. ते 56 टक्क्यांनी आघाडीवर आहेत. इमर्सन कॉलेजच्या सर्वेक्षणानुसार, डीसॅंटिस यांच्या समर्थनात तीव्र घट दिसून आलीय. त्यांना जूनमध्ये 21 टक्के पाठिंबा होता. तर रामास्वामी यांना फक्त 2 टक्के पाठिंबा होता.
रामास्वामींच्या समर्थनात वाढ : द हिलमधील एका वृत्तानुसार, रामास्वामी समर्थकांपैकी जवळपास निम्म्या समर्थकांनी सांगितले की ते त्यांनाच मत देतील. तर डीसँटीस समर्थकांपैकी फक्त एक तृतीयांश समर्थकांनी असे विश्वासाने सांगितले. दरम्यान, 80 टक्क्यांहून अधिक ट्रम्प समर्थकांनी सांगितले की ते निश्चितपणे डोनाल्ड ट्रम्प यांनाच मतदान करतील.
युवा मतदारांचा रामास्वामींना पाठिंबा : इमर्सन कॉलेज पोलिंगचे कार्यकारी संचालक स्पेन्सर किमबॉल यांनी एका प्रकाशनात म्हटले आहे की, रामास्वामींना पदवीधर मतदारांकडून अधिक समर्थन मिळत आहेत. त्या गटातील 17 टक्के लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय. तरुण मतदारांसह, 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 16 टक्के मतदारांनी रामास्वामींवर विश्वास ठेवला आहे. द हिलच्या मते, पदव्युत्तर मतदारांमध्ये डीसॅंटिस यांची लोकप्रियता कमी झाली आहे. जूनमध्ये त्यांना 38 टक्के पाठिंबा होता. आता ते 14 टक्क्यांवर आले आहेत. 35 वर्षांखालील केवळ 15 टक्के मतदारांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय.
विवेक रामास्वामी कोण आहेत : 37 वर्षीय विवेक रामास्वामी हे अमेरिकेतील आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. त्यांना लेखनातही रस आहे. रामास्वामी यांचे कुटुंब मूळचे केरळचे आहे. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९८५ रोजी अमेरिकेतील सिनसिनाटी येथे झाला. त्यांचे बालपण ओहायोमध्ये गेले. अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलंय. विवेक रामास्वामी यांचा दावा आहे की, अमेरिकेतील स्थलांतरितांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी पक्षात प्रवेश केला होता.
हेही वाचा :
- US President Race : अमेरिकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची शक्यता वाढली; चौथा भारतीय वंशाचा उमेदवार शर्यतीत
- Vivek Ramaswamy : आणखी एक भारतीय वंशाचा नागरिक लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक, ट्रम्प यांना देणार टक्कर!
- US President Race : अमेरिकेत भारतीयांचा दबदबा, अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा तिसरा उमेदवार उतरला