सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया) : कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमधील गुरुद्वारामध्ये रविवारी दोन जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. हा गोळीबार का करण्यात आला हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेनंतर हल्लेखोर फरार आहेत. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. मात्र धार्मिक स्थळावर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात चिंता वाढली आहे.
जखमींची प्रकृती चिंताजनक : काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की, सॅक्रामेंटो शीख सोसायटी गुरुद्वाऱ्यात स्थानिक वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास गोळीबार झाला. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शेरीफ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सॅक्रामेंटो काउंटी शेरीफ कार्यालयाचे प्रवक्ते अमर गांधी यांनी सांगितले की, हा गोळीबार द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंधित नाही. त्यांनी सांगितले की, भांडणात तीन लोक सामील होते. गोळीबारानंतर तेथे आणखी लोक जमा झाले. ते म्हणाले की, 'या भांडणात सामील असलेले सर्व लोक एकमेकांना ओळखत होते. कुठल्यातरी घटनेवरून भांडणात रुपांतर झाले.
अमेरिकेत हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ : अमेरिकेत गेल्या काही वर्षांत अनेक प्राणघातक गोळीबारासह बंदूक हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत. अमेरिकेत अशाप्रकारचा हिंसाचार सामान्य बाब आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक आदेश काढून बंदूक विक्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या तपासणीला चालना दिली आहे. डेन्व्हर पोलिसांनी नोंदवले की, गेल्या आठवड्यात कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हरमधील ईस्ट हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारानंतर किमान दोन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जगभरातील फुटीरतावादी शिखांमध्ये राग : पंजाब सरकारने केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने खलिस्तानी फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंगच्या विरोधात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. त्याच्या अनेक साथीदारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करून आसामला पाठवण्यात आले आहे, अमृतपाल अजूनही फरार आहे. यामुळे जगभरातील अनेक फुटीरतावादी शिखांमध्ये राग असून त्यांनी अलीकडच्या काही दिवसांत वॉशिंग्टन आणि लंडनमधील भारतीय दूतावासांवर हल्ले केले आहेत.