इस्लामाबाद(पाकिस्तान) - पाकिस्तानच्या पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या सुमारे डझनभर नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आवाराबाहेर खान यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर रविवारी या कटात सहभागी असल्याबद्दल दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
न्यायालयीन परिसरात तोडफोड - तोशाखाना खटल्याच्या बहुप्रतिक्षित सुनावणीला हजर राहण्यासाठी इम्रान खान हे लाहोरहून इस्लामाबादला आले होते, तेव्हा इस्लामाबाद न्यायालयीन संकुलाबाहेर त्यांचे समर्थक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात राडा झाला होता. शनिवारी पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात 25 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी सुनावणी 30 मार्चपर्यंत पुढे ढकलली होती.
एफआयआर दाखल - पीटीआयचे कार्यकर्ते आणि काही नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलने हे वृत्त दिले आहे. इस्लामाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीटीआयच्या १७ नेत्यांची नावे असल्याचे वृत्त दिले आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, कार्यकर्त्यांनी पोलिस चौकी आणि न्यायालयीन संकुलाचे मुख्य गेट उद्ध्वस्त केले. तसेच परिसराचे मोठे नुकसान केले आहे.
अनेक वाहनांची केली तोडफोड - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाळपोळ, दगडफेक आणि न्यायालयीन संकुलाच्या इमारतीचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एफआयआरनुसार, वादावादीदरम्यान दोन पोलिस वाहने आणि सात मोटारसायकली जाळण्यात आल्या होत्या. तसेच पोलिस स्टेशन प्रभारींच्या वाहनाचे नुकसान करण्यात आले होते. न्यायालयात हजर राहण्यासाठी इम्रान खान हे लाहोरहून इस्लामाबादला आले होते. ताफ्यात त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत होते.
इम्रान खान यांनी प्रसिद्ध केला होता व्हिडिओ - इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी केला होते. यात ते म्हणाले की, मला तुम्ही तुरुंगात पाठवून प्रकरण सुटणार नाही. येथील सरकारला वाटते की मी तुरुंगात गेलो तर जनता शांत राहील पण तसे होणार नाही. तसेच मी एक जनयुद्ध लढत आहे. मला मारून टाका, तुम्हाला देशासाठी लढावे लागेल, असेही इम्रान खान जनतेला संबोधून म्हणाले होते.
हेही वाचा - Imran Khan Arrest: इम्रान खान यांना कधीही होऊ शकते अटक, पीटीआयचे कार्यकर्ते झाले आक्रमक