माले Indian Troops Maldives : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला आपल्या देशातून सैन्य मागे घेण्यास सांगितलं आहे. मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाचे सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी रविवारी ही माहिती दिली.
मार्च मध्यापर्यंत माघारी बोलवा : मालदीवमध्ये अनेक वर्षांपासून भारतीय सैन्याची छोटी तुकडी तैनात आहे. सध्या तेथे 88 भारतीय जवान आहेत. या जवानांना मार्च मध्यापर्यंत माघारी बोलवा, असं मालदीव सरकारनं सांगितलं. विशेष म्हणजे, मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरून भारत सरकारनं तेथे आपलं सैन्य तैनात केलं होतं. सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारण कार्यात मदत करण्यासाठी भारतीय सैन्याची तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आलीय.
मुइज्जू चीन दौऱ्यावरून परतले : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू नुकतेच पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरून मायदेशी परतले. मालदीवमध्ये पोहोचताच त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. आमचा देश छोटा असला तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना कोणाला नाही, असं ते म्हणाले. मुइज्जू यांनी कोणाचंही नाव घेऊन थेट हे वक्तव्य केलेलं नाही. मात्र त्यांचं लक्ष्य भारताकडे असल्याचं मानलं जात आहे. चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मुइझू यांनी पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं असताना त्यांचा दौरा झाला. या मुद्द्यावरून भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक वाद वाढत आहे.
2013 पासून सैनिक तैनात : भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी मालदीव सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. 2013 पासून लामू आणि अड्डू बेटांवर भारतीय सैनिक तैनात आहेत. तसेच मालदीवमध्ये भारतीय नौसैनिकही आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर, मुइज्जू यांनी जाहीर केलं की त्यांची प्राथमिक जबाबदारी हिंद महासागर द्वीपसमूहातील परदेशी सैन्याची उपस्थिती दूर करणं असेल. गेल्या वर्षी मालदीवचे अध्यक्ष झाल्यानंतर मुइज्जू यांनी भारताला मालदीवमधून आपलं सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली होती.
काय वाद आहे : मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपमधील फोटोंबाबत काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर या प्रकरणानं सोशल मीडियावर जोर पकडला. मालदीव सरकारनं तीन मंत्र्यांना निलंबित केलं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानंही मालदीवच्या राजदूताला बोलावून या प्रकरणावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.
हे वाचलंत का :