नवी दिल्ली Justin Trudeau Reaction : सोमवारी कॅनडानं खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे आरोप करत भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. यावर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, कॅनडाच्या राजदूताला ५ दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले. भारताच्या या प्रतिक्रियेनंतर कॅनडानं आता जरा नरमाईची भूमिका घेतली आहे. 'आम्ही भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही. आम्हाला फक्त या प्रश्नाकडं भारताचं लक्ष वेधायचं होतं', असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले. 'भारत सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आम्हीही तेच करत आहोत. आम्ही या प्रकरणी चिथावणी देण्याचा किंवा प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करत नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण : सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारत सरकारवर धक्कादायक आरोप केले होते. खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारतीय राजदूताचा हात असल्याचे पुरेसे पुरावे आमच्याकडं असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर कॅनडातील भारतीय राजदूताची हकालपट्टी करण्यात आली. याला भारतानं जशास तसं प्रत्युत्तर देतं, कॅनडाच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले.
भारतानं आरोप फेटाळून लावला : खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा कॅनडाचा आरोप मोदी सरकारनं मंगळवारी त्वरित फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्रालयानं या आरोपांना मूर्खपणाचं म्हटलंय. कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप हास्यास्पद आणि प्रेरित असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं. मंत्रालयानं म्हटलं की, या प्रकरणावर कॅनडा सरकारची निष्क्रियता ही दीर्घकाळापासून चिंतेची बाब आहे. कॅनडाच्या राजकीय व्यक्तींकडून अशा घटकांबद्दल उघडपणे सहानुभूती व्यक्त करणं चिंतेची बाब आहे. अशा घडामोडींशी भारत सरकारला जोडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही नाकारतो, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं.
अमेरिकेनं चिंता व्यक्त केली : पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील चिंता व्यक्त केली आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 'पंतप्रधान ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांबद्दल आम्ही अत्यंत चिंतित आहोत. या प्रकरणी आम्ही कॅनडाशी नियमित संपर्कात आहोत, असं मंत्रालयानं सांगितलं.
हेही वाचा :