न्यूयॉर्क : India Canada Row : भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरुन चांगलाच वाद रंगला आहे. या वादावर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चांगलाच हल्लाबोल केला. न्यूयार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( S Jaishankar ) यांना एका महिला पत्रकारानं हरदीप सिंग निज्जरच्या हत्येची माहिती शेअर करण्याचा प्रश्न विचारला होता. यावर मी 'फाईव्ह आईज' गटाचा भाग नाही, किवा एफबीआयचाही भाग नसल्याचं एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते एस जयशंकर : परंराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे न्यूयार्कला 'डिस्कशन अॅट कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना एका महिला पत्रकारानं खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येविषयी प्रश्न विचारला. त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महिला पत्रकारावर चांगलाच पलटवार केला. 'मी फाईव्ह आईज चा भाग नाही, किवा मी एफबीआयचा ही भाग नाही. त्यामुळे तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारला', असं एस जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काय आहे फाईव्ह आईज समूह : फाईव्ह आईज हा पाच देशाचा समूह आहे. या समूहात एकमेकांच्या देशाच्या बाबत असलेली गुप्तचर माहिती एकमेकांना शेअर करते. या पाच देशात अशी गुप्तचर माहिती शेअर करण्यासाठी झालेल्या करारानुसार हा गट स्थापन करण्यात आला आहे. फाईव्ह आईज या गटात अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा यांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राजदूत डेव्हिड कोहेन यांनी दिली माहिती : कॅनडातील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड कोहेन यांनी हरदीप सिंग निज्जर याच्याबाबतची माहिती फाईव्ह आईजच्या गटात शेअर केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले होते. अमेरिका आणि कॅनडातील फाईव्ह आईजच्या करारानुसार ही माहिती शेअर केल्यानं हा वाद निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपण या गटाचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं.
कॅनडानं माहिती दिली तर कारवाई करू : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी आरोप केले होते. याप्रकरणी बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कॅनडानं माहिती दिली असेल, तर आम्ही कारवाई करू, असं स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षात कॅनडात संघटीत गुन्हेगारी, खलिस्तानवादी गुन्हेगारी खूप खोलवर रुतलेले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कॅनडाकडं काही माहिती असेल, तर त्यांनी ती द्यावी, आम्ही कारवाई करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आम्ही कॅनडा सरकारकडं अनेकदा गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाबाबत विनंती केली आहे. आमच्या यादीत अनेक दहशतवाद्यांची नावं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :