गाझियाबाद (उ. प्रदेश) : भारतीय हवाई दलाचे C130J-हरक्यूलिस विमान आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांसह गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून मंगळवारी रात्री सीरियाला रवाना झाले. या विमानात 6.5 टन जीवनरक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय औषधांचा साठा आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली.
भारत भूकंपग्रस्तांच्या पाठीशी : परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट केले की, 'हवाई दलाचे एक विमान सहा टन आपत्कालीन मदत घेऊन सीरियाला रवाना झाले आहे. विमानाच्या या खेपेमध्ये जीवरक्षक औषधे आणि आपत्कालीन वैद्यकीय वस्तूंचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत भारत एकजुटीने उभा आहे. सोमवारी तुर्की आणि सीरियात भूकंपाचे भीषण धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर यांची तीव्रता 7.8 एवढी नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे.
आपत्कालीन औषधे पाठवली : आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्ते राजेश नायर म्हणाले, 'विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी जीव वाचवणारी औषधे आणि इतर उपकरणे सीरियाला पाठवली जात आहेत. ही औषधे आणि इतर उपकरणे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या समन्वयाने पाठवली जात आहेत. ते पुढे म्हणाले की, 'अशा परिस्थितीत रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या औषधांची यादी तयार करण्यात आली आहे. मंत्रालयाने दिलेल्या यादीनुसार औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
काल तुर्कीला मदतीची तुकडी रवाना : काल भारताने हवाई दलाच्या विमानात भूकंप मदत सामग्रीची पहिली तुकडी तुर्कीला पाठवली होती. या शिपमेंटमध्ये तज्ज्ञ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल शोध आणि बचाव पथकासह पुरुष आणि महिला कर्मचारी, उच्च-कुशल श्वान पथके, वैद्यकीय पुरवठा, प्रगत ड्रिलिंग उपकरणे आणि मदत कार्यासाठी आवश्यक असलेली इतर महत्त्वपूर्ण साधने यांचा समावेश होता. भारतातील तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारत सरकारच्या मदतीच्या प्रस्तावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, गरजेत मदत करणारा मित्रच खरा मित्र असतो, असे ट्विट केले.
भूकंपग्रस्तांना जगभरातून मदत : सोमवारी इराकचे पंतप्रधान मोहम्मद एस. अल-सुदानी यांनी घोषणा केली की, ते आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा, प्रथमोपचार आणि निवारा पुरवठा तसेच औषध आणि इंधन पाठवतील. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनीही आपत्तीग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार, तुर्कीमधील भूकंपाला प्रतिसाद म्हणून जपानने देशाच्या आपत्ती निवारण बचाव पथकाला पाठवले आहे. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीला अमेरिकेने देखील मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा : India Help Turkey : भूकंपाने संकटात सापडलेल्या तुर्कीला भारताचा मदतीचा हात, विमानाने साहित्य रवाना