इस्लामाबाद (पाकिस्तान) - पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) शुक्रवारी तोशाखाना खटल्यातील निकालात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अपात्र ठरवले. ईसीपीने म्हटले आहे की इम्रान खान यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि ते भ्रष्ट व्यवहारात गुंतले आहेत.
यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी, तोशाखाना खटल्याच्या सुनावणीत, इम्रान खान यांचे वकील अली जफर यांनी कबूल केले की इम्रान खान यांनी 2018-19 मध्ये त्यांना मिळालेल्या किमान चार भेटवस्तू विकल्या होत्या. भेटवस्तू 58 दशलक्ष रुपयांना विकल्या गेल्या आणि त्यांच्या पावत्या त्यांनी दाखल केलेल्या आयकर रिटर्नसह जोडल्या गेल्या. दरम्यान, ऑगस्टमध्ये पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) ने असा दावा केला होता की खान यांनी 'तोशाखाना'मधून घरी नेलेल्या काही वस्तूंसाठी पैसे दिले होते. परंतु त्यांनी सरकारी खजिन्यातून घेतलेल्या बहुतेक वस्तूंचे पैसे न देताच लिलाव केले गेले. खान यांनी, त्यांनी घेतलेल्या भेटवस्तूंचा खुलासा केला नाही आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली. याबाबतचे वृत्त जिओ न्यूजने दिल्याचे एएनआयने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, सरकारी अधिकार्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची तात्काळ तक्रार केली जाते. जेणेकरून त्यांचे मूल्य मूल्यांकन करता येईल. मूल्यमापन झाल्यानंतरच, ज्याला ती मिळाली तो ती भेटवस्तू घेऊ शकतो. त्याला ती स्वतःकडे ठेवायची असल्यास, विशिष्ट रक्कम जमा केल्यानंतर तसे करता येते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्यांचा लिलाव करून त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा करावा लागतो.
गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी सरकारी खजिना घरातून एकत्रितपणे 154 दशलक्ष पाकिस्तानी रुपये (PKR) पेक्षा जास्त किमतीची तीन महागडी घड्याळे एका स्थानिक घड्याळ विक्रेत्याला विकली, असे वृत्त आहे. द न्यूज इंटरनॅशनल वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. इम्रान खान यांनी त्यांना परदेशी मान्यवरांनी भेट दिलेल्या या ज्वेल-क्लास घड्याळांमधून लाखो रुपये कमावले आहेत. पीटीआयच्या प्रमुखाने प्रथम महागडी घड्याळे विकली. नंतर प्रत्येकी 20 टक्के सरकारी तिजोरीत जमा केली, असे पाकिस्तानच्या एका दैनिकाने कागदपत्रे आणि विक्री पावत्याचा हवाला देऊन म्हटले आहे. लाखो रुपयांच्या या भेटवस्तू तोषखान्यात कधीच जमा झाल्या नाहीत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
यावर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांचे पूर्ववर्ती इम्रान खान यांच्यावर दुबईमध्ये PKR 140 दशलक्ष किमतीच्या तोशाखाना भेटवस्तू विकल्याचा आरोप केला होता. महागड्या भेटवस्तूंमध्ये डायमंड ज्वेलरी सेट, ब्रेसलेट आणि मनगटी घड्याळांचा समावेश आहे. शेहबाज यांनी याबाबत खुलासा इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तोशाखान्याचा तपशील मागणाऱ्या याचिकेच्या प्रश्नाला उत्तर देताना झाला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी टिप्पणी केली होती की अधिकृत गुपिते कायदा, 1923 नुसार तपशील उघड करणे शक्य नाही.