लंडन British Home Minister : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्रात मेट्रोपॉलिटन पोलिसांना लक्ष्य करणारा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी सुनक यांनी हे पाऊल उचललं. वृत्तपत्रात हा लेख प्रकाशित झाल्यापासून, ब्रेव्हरमन यांच्या भविष्याबद्दल विविध चर्चा सुरू होत्या.
माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून परराष्ट्रमंत्री बनले : ब्रेव्हरमन यांच्या जागी आता ५४ वर्षीय परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांना गृहमंत्रालयाचा कारभार देण्यात आलाय. विशेष म्हणजे, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाच दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. त्यांच्याशी चर्चेच्या दिवशीच क्लेव्हरली यांना परराष्ट्र मंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. महत्वाचं म्हणजे, त्यांच्या जागी ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतासोबतच्या आगामी द्विपक्षीय बैठका कशा पार पडतील, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
वाद काय आहे : इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यानंतर लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली होती. 'द टाईम्स' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात ब्रेव्हरमन यांनी मेट्रोपॉलिटन पोलिसांवर या निदर्शनांशी कठोरपणे न वागल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना चहुबाजूंनी टीकेचा सामना करावा लागला. ४३ वर्षीय सुएला ब्रेव्हरमन यांच्या टिप्पण्या अनेकदा वादग्रस्त ठरल्या आहेत. ब्रेव्हरमन यांच्या या टिप्पणीनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अनेक सदस्यांचा दबाव होता. याशिवाय त्यांना विरोधकांच्या हल्ल्यांनाही सामोरे जावं लागलं होतं.
एस जयशंकर ब्रिटनच्या दौऱ्यावर : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सध्या ब्रिटनच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांची डाउनिंग स्ट्रीट इथं भेट घेतली. द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेण्याच्या आणि मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना देण्याच्या उद्देशानं या भेटीचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा :