बगदाद - इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला. त्याच्यासह आणखी ६ जणही ठार झाले. अल जझीरा या वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे.
सुलेमानीशिवाय इराकी बिगरलष्करी सेनेचा कमांडर अबु महदी अल-मुहान्दीस हाही या हल्ल्यात ठार झाला. इराकमधील पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्स (PMF - जमवाजमव करून तयार केलेले बिगरलष्करी सशस्त्र गट) प्रसिद्ध आहेत. हे सर्व गट इराणच्या बिगरलष्करी सशस्त्र पाठिंब्याने तयार झाले आहेत. त्यांनीही सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक क्षेपणास्त्रांनी 'उच्च दर्जाच्या व्यक्तीं'च्या दोन वाहनांना लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराक-इराण दरम्यानचे संबंध आणखीनच बिघडणार आहेत. इराणच्या बिगरलष्करी सशस्त्र गटांनी आणि इतर निदर्शकांनी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला चढवला होता. याविरोधात कारवाई करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.
अमेरिकेने निदर्शकांच्या गटांवर हल्ला चढवत हवाई स्ट्राईक केला होता. यामध्ये PMF मधील २५ जण ठार झाले होते. याचा सूड घेण्यासाठी या गटांकडून अमेरिकन दूतावासावर हल्ला चढवण्यात आला होता.