काबुल - अफगाणिस्तानमध्ये सोमवारी एक विमान क्रॅश झाले होते. हे विमान अमेरिकी हवाई दलाचे असल्याचे तालिबान या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या अफगाणी पत्रकारांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, अमेरिकी लष्कराच्या एका प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, सोशल मीडियावर या विमानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे, त्यावरून हे विमान अमेरिकी हवाई दलाचे गस्त घालणारे विमान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तारिक घांझिवाल या पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, त्याने हे क्रॅश झालेले विमान पाहिले आहे. ट्विटरवर 'दि असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेसोबत झालेल्या चर्चेत त्याने सांगितले, की या विमानाच्या समोर दोन जळालेले मृतदेहही त्याने पाहिले. क्रॅश झाल्यामुळे या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याने दिलेल्या माहितीची सत्यता अद्याप पडताळण्यात आली नाहीये.
सोशल मीडियावर या विमानाचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून असा अंदाज वर्तवला जात आहे, की हे अमेरिकी हवाई दलाचे 'बॉम्बार्डियर ई -11 ए' हे विमान आहे. हे विमान अफगाणिस्तानवर गस्त घालण्यासाठी (इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलियंस) वापरण्यात येते. या विमानावर असलेला रजिस्ट्रेशन नंबरही व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दिसून येत आहे, ज्यावरूनही हे अमेरिकेचे विमान असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.
हे प्रकरण अपघात असेल, तर त्याचा अमेरिका-तालिबान शांतता चर्चेवर काही परिणाम होणार नाही. जवळपास अर्ध्या अफगाणिस्थानवर नियंत्रण ठेवणाऱ्या तालिबानसोबत अमेरिका शांतता करार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, काही ना काही कारणास्तव वारंवार यात अडथळे येत आहेत. त्यात आता या नव्या प्रकरणाची भर पडली आहे. तालिबान-अमेरिका शांतता करार यशस्वी झाल्यास जवळपास १३,००० अमेरिकी सैनिकांच्या तुकड्या मायदेशी परतू शकणार आहेत. शिवाय अफगाणिस्तानही युद्धाच्या विळख्यातून बाहेर पडल्यामुळे, त्याला अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा : कोरोनाचा कहर : मृतांची संख्या ८० वर; तर २३०० हून अधिक नागरिकांना संसर्ग..