जेरुसलेम : इस्राईलच्या ओल्ड सिटीमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दंगलीत सुमारे ८० पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी १४ नागरिकांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पॅलेस्टिनी आंदोलकांनी सुरक्षा दलांवर काचेच्या बाटल्या आणि दगड फेकून मारले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर म्हणून स्टन ग्रेनेड आणि वॉटर कॅनन्सचा वापर केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अतिरेकी संघटनांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी..
शनिवारी रात्री सुमारे ९० हजार पॅलेस्टिनी नागरिक लायलत अल-कद्र या प्रार्थनेसाठी टेम्पल माऊंटच्या ठिकाणी एकत्र आले होते. रमदानची ही सर्वात पवित्र रात्र समजली जाते. यावेळी कित्येक नागरिकांनी हमास या अतिरेकी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यात जेरुसलेमच्या मुद्द्यावरुन इस्राईलवर हल्ला करण्याच्या गोष्टीचाही उल्लेख होता.
पॅलेस्टिनी नागरिकांच्या विस्थापनावरुन तणाव..
दरम्यान, दुसरीकडे शेख जार्राह परिसरातही काही कारणामुळे वाद निर्माण झाला. याठिकाणी दोन पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्राईलच्या पोलीस अधिकाऱ्यांवर पेपर स्प्रेने हल्ला केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. याठिकाणी गेल्या आठवड्यापासून तणावाचे वातावरण आहे. इस्राईल सरकारने २८ पॅलेस्टिनी कुटुंबांचे विस्थापन करण्याचे जाहीर केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे.
यानंतर पॅलेस्टाईनमधील गाझा स्ट्रिपवरुन इस्राईलवर क्षेपणास्त्रही सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोणतीही जीवीतहानी वा वित्तहानी झाली नसल्याचे इस्राईलच्या सुरक्षा दलांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : भारत-युरोपियन युनियन परिषदेमुळे व्यापार, गुंतवणूक आणि परस्पर संबंधांना चालना - जितेंद्र त्रिपाठी