रियाध (सौदी अरेबिया) - जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या यात्रेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. सौदी अरेबियाने हज यात्रेकरता विविध देशांतील केवळ 1 हजार यात्रेकरूंना परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
सौदी अरेबियामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे.
सौदी अरेबियाने आधुनिक राजेशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच हज यात्रेकरूंच्या संख्येवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.
गतवर्षी पाच दिवसीय हज यात्रेत 2.5 दशलक्ष यात्रेकरूंनी सहभाग घेतला होता. त्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात यात्रेकरूंना सहभागी होण्याची सौदी अरेबियाने परवानगी दिली आहे.
हज यात्रेचा प्रारंभ 31 जुलैपासून होत आहे. मात्र, यात्रेकरूंची कोणत्या निकषावर निवड करायची, ही बाब अद्याप सौदी अरेबियाने जाहीर केली नाही.
हज मंत्री मोहम्मद बेनटेन यांनी सांगितले, की हज यात्रेकरूंची संख्या 1000 किंवा त्याहून खूप कमी होऊ शकते. आरोग्यमंत्री तौफिक-अल-रबियाह म्हणाले की, 65 वर्षाहून कमी आणि गंभीर आजारी असलेल्या लोकांना यात्रेत प्रवेश मिळणार नाही.
आखाती देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग सौदी अरेबियामध्ये आहे. सौदी अरेबियामध्ये 1 लाख 61 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 300 जणांचा मृत्यू झाला आहे.