रियाध - राजधानी रियाधवरील क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावल्याचा दावा सौदी अरेबियाने केला आहे. सोबतच देशाच्या दक्षिण प्रांतातवर ड्रोनमध्ये बॉम्ब ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा हल्लाही आम्ही परतावून लावला असा दावा सौदीने केला आहे. येमेनमधील हौती बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा आरोप सौदीने केला आहे.
येमेनमधील वादाचे पडसाद -
येमनमधील हौती बंडखोरांसोबत सौदी अरेबिया आणि येमेनचे लष्कर संयुक्तपणे लढत आहे. तर इराणच्या पाठिंब्याने हौती बंडखोर लढा देत आहेत. मागील अने वर्षांपासून हे गृहयुद्ध सुरू आहे. हौती बंडखोरांनी रियाधवर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केला. मात्र, क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. तसेच देशाच्या जीझान या दक्षिण प्रांतावर स्फोटकांनी भरलेल्या तीन ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची सौदीने दिली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली नाही. हौती बंडखोरांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही.
मध्यपूर्वेतील तणावात वाढ -
मध्यपूर्वेत तणाव वाढत असतानाच सौदीवरील हल्ल्याची घटना घडली. ओमानच्या आखातात इस्राईलच्या जहाजात रहस्यमयरित्या स्फोट झाला. त्यामुळे या जलवाहतूक मार्गावर मालवाहू जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजधानी रियाधवर हवेत स्फोट झाल्याचा व्हिडिओ काही स्थानिक माध्यमांनीही दाखवले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. अमेरिका बनावटीच्या पॅट्रियॉट क्षेपणास्त्र विरोधी मिसाईलने हवेत शत्रूचे मिसाईल नष्ट केल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.