इस्लामाबाद - तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या कारी सैफुल्ला मेहसूद याला अफगाणिस्तानमध्ये कंठस्नान घालण्यात आले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील गुलून कॅम्पमध्ये त्याला ठार करण्यात आले.
या दहशतवादी संघटनेच्या एका प्रवक्त्याने या घटनेबाबत माहिती दिली आहे. ही कारवाई नक्कीच हक्कानी नेटवर्क या समूहाने केल्याचा संशय त्याने व्यक्त केला. हक्कानी नेटवर्कने काही दिवसांपूर्वीच टीटीपीच्या हकीमुल्ला मेहसूद टोळीवर हल्ला करून त्यामधील तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते.
बैतुल्ला मेहसूद याने २००७ मध्ये टीटीपीची स्थापना केली होती. सध्या टीटीपी चार समूहांमध्ये विभागले गेले आहे. स्वॉट ग्रुप, मेहसूद ग्रुप, बाजौर एजन्सी ग्रुप आणि दार्रा आदमखेल ग्रुप.
कारी सैफुल्ला मेहसूदने पाकिस्तानमध्ये बरेच दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याचा शोध घेत होते. त्याने एका ऑडिओ संदेशात जाहीर केले होते, की यावर्षी त्याने ७५ दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. यापैकी बहुतांश हल्ले हे उत्तर आणि दक्षिण वाझिरिस्तान जिल्ह्यामध्ये करण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या या वक्तव्याला दुजोरा दिला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहसूदचा मृत्यूने टीटीपीचे मोठे नुकसान झाले आहे. मेहसूद हा टीटीपीच्या चारही समूहांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होता. तसेच टीटीपीचा तो सर्वाधिक कार्यशील दहशतवादी होता, अशी माहिती सबूर खट्टाक या वरिष्ठ पत्रकाराने दिली आहे. ते पुढे म्हणाले, की २०१५ ला कराचीमध्ये बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी मेहसूदनेच स्वीकारली होती. या हल्ल्यात ४५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
हेही वाचा : बुर्किना फासो देशात दहशतवाद्यांचा भीषण हल्ला; ३५ मृत्यूमुखी, प्रत्त्युत्तरात ८० दहशतवाद्यांचा खात्मा