तेहरान - दारू पिल्यामुळे कोरोना बरा होतो, अशा चुकीच्या माहितीमुळे इराणमधील ७०० लोकांचा बळी गेला आहे. विषारी दारुमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
इराणमधील काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार बळींची संख्या सरकारने जाहीर केलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे. मात्र, कित्येक लोकांचा रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाल्यामुळे आकड्यांमध्ये तफावत दिसून येत आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार हुसैन हसानियन यांनी दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २०० नागरिकांचा रुग्णालयांच्या बाहेर मृत्यू झाला आहे.
इराण सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी ते ७ एप्रिल दरम्यान देशातील ७२८ लोकांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या संपूर्ण वर्षामध्ये देशभरात ६६ लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. यावरून सध्याचे आकडे किती गंभीर आहेत, हे लक्षात येते.
यासोबतच, मिथेनॉलच्या विषारी दारुमुळे २० फेब्रुवारीनंतर सुमारे ५२५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही एका अहवालात समोर आले आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किनौश जहानपूर यांनी याबाबत माहिती दिली. देशात एकूण ५,०११ नागरिकांना मिथेनॉलच्या विषारी दारूची बाधा झाल्याचेही त्यांनी सांगितले. विषारी दारुमुळे सुमारे १००हून अधिक लोकांची दृष्टीही गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, मध्य-पूर्व आशियामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ९१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून, सुमारे सहा हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : 'या' विमान कंपनीतील बारा हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार..?