बैरुत : लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण स्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवले होते. यानंतर देशाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.
सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री हमद हसन यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, तसेच कित्येकांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे सर्वांनीच राजीनामा दिला आहे, असे ते म्हणाले.
यानंतर पंतप्रधान हसन दियाब हे सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे हमद यांनी सांगितले.
लेबनॉन मधील बैरुत येथे या आठवड्यात झालेल्या मोठ्या स्फोटांमुळे जनता संतप्त झाली होती. या संतापाने शनिवारी रात्री एक नवीन वळण घेतले. निदर्शकांनी सरकारी संस्थांवर जोरदार हल्ला केला, यामुळे सुरक्षा दलांशी त्यांची चकमक झाली. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या वायूच्या कांड्या आणि रबरच्या गोळ्यांनी प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दले आणि निदर्शकांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर बारा लोक जखमी झाले. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी निदर्शकांनी केली होती.
बैरुतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 160 लोकांचा मृत्यू झाला, तसेच सहा हजार लोक जखमी झाले आहेत.